
Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता पोलिस आणि सीआयडीकडून तपासाची सूत्रे वेगाने फिरवली जात आहे. एकीकडे जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून या हत्येवरुन संतापाची लाट उसळली आहे. सरकार आणि पोलिस प्रशासनावरचा राजकीय दबाव वाढतोच आहे. यातच आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
याप्रकरणी गंभीर आरोप होत असलेले आणि फरार अशा वाल्मिक कराड यांच्याभोवतीचा फास पोलिस आणि सीआयडीकडून आवळला जात आहेत. दुसरीकडे कराड यांच्यावर पोलिसांकडून खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून दिवस रात्र शोध मोहीम सुरू आहे. सीआयडीकडून शुक्रवारी (ता.27) वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली यांची कसून चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे.
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्येनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. त्याचमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र,तरीही विरोधकांचं समाधान झालं नव्हतं.
अखेर गृहमंत्र्यांना हिवाळी अधिवेशनातच या घटनेचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याची घोषणा करावी लागली. यानंतर आता तपासानं वेग घेतला असून लवकरच या हत्येपाठीमागचा मास्टरमाइंडला अटक करण्यात येईल असं बोललं जात आहे.
वाल्मिक कराड हे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे विरोधकांकडून मुंडेंना चांगलंच टार्गेट करण्यात येत आहे. वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे. खंडणीप्रकरणात वाल्मिक कराड हा सध्या फरार आहेत.
त्याचमुळे बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये सीआयडीच्या पथकाकडून दोन ते अडीच तासांहून अधिक काळ मंजिली कराड यांची चौकशी करण्यात आली आहे.त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं आहे. पोलिसांनी हा चौकशीचा भाग असल्याचं सांगितलं आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बीड जिल्ह्यातील अवैध शस्त्रांचा मुद्दा उचलून धरत गुन्हेगारांच्या दहशत निर्माण केली जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटवरून त्यांनी बंदूक असणाऱ्यांचे फोटो शेअर केले आहेत. दमानिया यांनी शुक्रवारी (ता.27) वाल्मिक कराड यांच्या मुलाचे फोटो आपल्या ट्विटवरून शेअर केले आहेत.
या ट्विटमध्ये महागड्या गाडीला एक मुलगा टेकून उभा राहिला आहे. त्याच्या कमरेला बंदुक लटकवली असल्याचे दिसते आहे. हा मुलगा वाल्मिक कराड यांचा पुत्र असल्याचे अंजली दमानीया यांनी म्हटले आहे. ट्विटमध्ये सुशील वाल्मिक कराड असे नाव टाकत याच्या नावावर कुठलाही परवाना नसल्याचे म्हटले आहे.या ट्विटवर कमेंटकरताना हा हा वाल्मिक कराड यांचा मुलगा आहे. याचे नाव 'श्री' आहे असे देखील दमानिया यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.