Chhatrapati Sambhajinagar News, 04 Apr : वक्फ सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Shivsena UBT) या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूने टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये आणखी एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे.
शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. ईदनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपण आल्याचं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं. तर इम्तियाज जलील यांनीही आपण नियमित दानवेंना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक वर्षापासून जातो.
आमच्यात राजकीय मतभेद आहेत म्हणून आम्ही एकमेकांचे शत्रू आहोत, असं नाही. या भेटीवरून कोणीही राजकीय अर्थ काढू नये, असं जलील म्हणाले. राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाल्यापासून सातत्याने त्यांच्यावर हिंदुत्व सोडल्याचा आणि मुस्लिमांचे लांगूलचालन सुरू केल्याचा आरोप सत्ताधारी शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडून केला जातो.
लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुस्लिमांच्या बाबतीत लवचिक भूमिका घेतल्याचं दिसून आलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वाद सुरू झाला त्यावेळीही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने वेगळी भूमिका घेतल्याचे दिसून आले होते. अशातच लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडण्यात आले. हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीही सभागृहात मंजूर झाले.
परंतु ठाकरेंच्या शिवसेनेने या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. यामुळे त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी आणि त्यांच्या पक्षाने हिंदुत्वाला तिलांजली दिली, बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले, असं म्हणत डिवचले. त्याला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आपल्या पद्धतीने रोखठोक प्रत्युत्तरही दिले.
त्यानंतर शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरात अंबादास दानवे आणि इम्तियाज जलील यांची झालेली भेट ही सदिच्छा म्हणून असली तरी याचे राजकीय पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये उमटू शकतात. विशेष म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आलेली असताना आणि ज्या जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला.
त्याच इम्तियाज जलील यांच्या घरी जाऊन त्यांची शिवसेनेचे दुसरे नेते अंबादास दानवे यांनी गळाभेट घेतल्यामुळे खैरे-दानवे यांच्यातील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंबादास दानवेंनी विधान परिषदेची निवडणूक सर्वाधिक मतांनी जिंकली होती, त्यांच्या या विजयात एमआयएमचाही मोठा वाटा होता. इम्तियाज जलील यांनी त्यावेळी केलेली मदत दानवे अजूनही विसरलेले नाहीत.
अशातच ईदनिमित्त त्यांनी घेतलेल्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडणार हे माहीत असल्यामुळे दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्याशी आपली विद्यार्थी दशेपासूनची मैत्री असल्याचं स्पष्ट केलं. तर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ते माझ्या घरी दरवर्षी येतात मीही त्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी येत असतो, असे दानवे यांनी माध्यमांना सांगितले. इम्तियाज जलील यांनीही त्यांचीच री ओढत आपल्या जुन्या मैत्रीचे दाखले देत या भेटीचे ज्याला कुणाला जे अर्थ काढायचे ते त्यांनी काढावेत.
आमच्या पक्षांची विचारसरणी वेगवेगळी आहे, आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे काम करत असलो तरी एकमेकांचे शत्रू नाही. अंबादास दानवे आज माझ्या घरी आले ते शिरखुर्मा घेतील मी ही दिवाळीला त्यांच्या घरी जाऊन नेहमी फराळ खात होतो, याचा पुनरुच्चार जलील यांनी केला. दोन दिवसांपूर्वी राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये घरवापसी करण्याची तयारी केली आहे.
हे करत असताना राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या आपल्या राजीनामा पत्रात चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तर अंबादास दानवे यांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर शिंदे-खैरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. याच दरम्यान खैरे यांनी दानवे माझं ऐकत नाही, उद्धव ठाकरे यांच्यासमोर वाद मिटले असतानाही मला कुठल्या कार्यक्रमाला बोलवत नाहीत.
विधानसभा निवडणुकीच्यावेळी चुकीच्या लोकांना पक्षात घेऊन आणि उमेदवारी देऊन त्यांनी उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली होती, असे गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंनी आज खैरेंचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेल्या इम्तियाज जलील यांची घरी जाऊन भेट घेतल्याने शिवसेनेतील खैरे विरुद्ध दानवे या अंतर्गत संघर्षालाही वेगळे वळण मिळणार यात शंका नाही.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.