Walmik Karad: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह इतर आरोपी बीडच्या कारागृहात कैद आहेत. या कारागृहातील अनेक कारनामे, आरोपींना मिळणारी व्हीआयपी सुविधा, वाल्मीक कराडच्या गुंडांकडून इतर कैद्यांना मारहाण असे प्रकार समोर येत आहेत. दोन दिवसापूर्वी अझहर पठाण नावाच्या कैद्याने सुदर्शन व प्रतिक घुले यांनी आपल्या जबर मारहाण केल्याचा ऑडिओ व्हायरल केला होता. यानंतर आता पुन्हा दुसऱ्या कैद्याचा ऑडिओ व्हायरल झाला असून त्यातही धक्कादायक दावे करण्यात आले आहेत.
या ऑडिओमधील दाव्यांनी एकच खळबळ उडाल्यानंतर काल अझहर पठाण याने हा ऑडिओ दबावातून केला होता. वाल्मीक कराड याला बदनाम करण्यासाठी व मस्साजोग सरपंचपदाची निवडणूक असल्यामुळे आपल्याला तो ऑडिओ कारागृहातील एक कर्मचारी, सनी आठवले आणि परभणे यांनी दिंडकर यांच्या निरोपावरून करायला लावला होता, असे सांगत पलटी मारली होती. मात्र, अझहर पठाण यांनी ऑडिओमध्ये ज्या सनी आठवले या कैद्याच्या नावाचा उल्लेख केला. त्याचा एक कथित ऑडिओ आज व्हायरल झाला आहे. यात अझहर पठाण याला वाल्मिक कराड गँगमधील सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांनी खरंच मारहाण केल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर संपूर्ण जेल प्रशासन हे वाल्मीक कराडच्या इशाऱ्यावर चालते. इथे सहानंतर कैद्यांना बराकीच्या बाहेर सोडले जाते, रात्री उशीरा चिकनच्या पार्ट्या केल्या जातात, असा दावा सनी आठवले याने केला आहे.
वाल्मीक कराड यांची जेलमध्ये दहशत आहे, पोलीसही त्याला मदत करतात. सगळ्या जेलमधील डीश टीव्ही बंद असताना वाल्मीकसाठी नवा डीश टीव्ही, सेटअप बॉक्स लावण्यात आला आहे. अझहर पठाण याने त्याच्या ऑडिओमध्ये माझ्या नावाचा उल्लेख केला, पण माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. जेलमध्ये वाल्मीक कराड आणि त्याच्या सहकारी कैद्याची मोठी दहशत आहे. जेलमधले प्रशासन हे त्यांच्या सांगण्यावर आहे. वाल्मीक कराड व त्याच्या साथीदारांना पैसे, मोबाईल पुरवले जातात. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. इथे कोणी चौकशीला आले तर मी सगळी माहिती द्यायला तयार आहे, असेही या कथित ऑडिओमध्ये सनी आठवले एका महिलेशी बोलताना सांगत आहे.
अजहर पठाणवर दबाव आणला जात आहे. त्याला खरंच मारहाण झाली असून त्याचा खुबा उपसला आहे. अझहर पठाणला मारहाण झाली होती, त्याचे सगळे स्टेटमेंट बदलले आहेत. वाल्मिक कराडला बंदी झालेली असताना रात्री साडेआठ वाजता बाहेर काढून त्याचा जबाब घेतला आहे. रात्री 9 वाजता बॅरेक क्रमांक तीनमध्ये आणून टाकले. सगळे अधिकारी त्याच्यावर दबाव आणत आहेत, 10 हजार रुपयांची कॅन्टीन देतो, बाहेर तुला पैसे देतो अशी वाल्मिक कराडने लालूच दिल्याचा दावा सनी या ऑडिओमध्ये करत आहे.
अझहर पठाण याने लिहिलेल्या चिठ्ठीवरही सनी आठवले यांनी संशय व्यक्त केला. जर त्याने ती चिठ्ठी लिहिली तर ती बाहेर कोणी आणली? याची चौकशी व्हायला पाहिजे. वाल्मिक कराडने आणि त्याच्या गँगने खोटे गुन्हे दाखल केले आणि असेच लोकं मारलेले आहेत आणि आता माझ्या जेल बदलीच्या मागे लागलेले आहेत. बाहेरच्या पथकाने इथे येऊन झडती घ्यायला पाहिजे. त्याच्याकडे किती आणि कोणाच्या नावावर सिमकार्ड आहेत ते मला माहित आहे. त्याला कोण कॅन्टीन देतो, कोण पैसे देतो आणि कोण पैसे घेतं हे सगळं मला माहित आहे.
सगळं जेल प्रशासन वाल्मिक कराडच्या जीवावर चालतंय. वाल्मिक कराडला नवीन डिश टीव्ही दिली आहे. सगळी व्हीआयपी सुविधा भेटते त्यांना इथे. अंजली दमानिया आणि सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी याची चौकशी लावावी. अझहरचा खुबा उपसला आहे, याची सगळी चौकशी करा. माझी जेल बदली करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा दावाही सनी आठवले याच्या कथित ऑडिओमध्ये आहे. या ऑडिओची सरकारनामा पुष्टी करत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.