Beed, 28 December : धनंजय मुंडेंनी गेली पाच वर्षे वाल्मिक कराडला पूर्ण अधिकार दिले होते. कार्यकारी पालकमंत्री म्हणून त्याचे त्यावेळी कौतुकही करण्यात आले होते, ते जगजाहीर आहे. त्यामुळे बीडमध्ये जे काही घडलं आहे, त्याला धनंजय मुंडेंची कार्यपद्धती जबाबदार आहे, असे माझे मत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंखे यांनी आपल्याच पक्षाचे आमदार मुंडेंवर केला आहे.
आमदार प्रकाश सोळुंखे (Prakash Salunkhe) म्हणाले, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेच्या 19 दिवसांनंतरही आरोपी पकडले जात नाहीत, यामुळे बीडमधील जनतेच्या मनात मोठा उद्रेक आहे. हे केवळ राजकीय वरदहस्त असल्यामुळे घडत आहे, अशी जनतेच्या मनातील शंका आहे आणि ती रास्त आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी आहेत, ते धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत. त्यांना पकडण्यासाठी एवढी दिरंगाई होत असल्याने सर्वसामान्य माणूस अस्वस्थ झालेला आहे, त्यामुळे बीडमधील सर्वसामान्य माणूस आज मूक मोर्चात सहभागी झालेला आहे.
वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे राजकारण सांभाळत असल्याने, त्यांच्यावर मुंडेंचा प्रचंड विश्वास असल्याने ही कदाचित आज हे झाले असेल. पण, आज खंडणीच्या गुन्ह्यात कराड याचे नाव आहे. प्रशासनातील अधिकारी सांगत आहेत की, त्याचा मोठा हस्तक्षेप होता. थेट आदेश देऊन काम करायला लावायचे, अशी त्याची प्रथा परंपरा होती. कराड याचे नाव खंडणीच्या प्रकरणात आलं आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणालाही हे खंडणीचे प्रकरण कारणीभूत आहे, असेही आमदारांनी स्पष्ट केले.
बीडमधील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आम्ही आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कानावर घातलेली आहे. गेल्या पाचपैकी चार वर्षे धनंजय मुंडे हे राज्याच्या मंत्रिमंडळात आणि पालकमंत्री होते. त्यांनी बीड जिल्ह्यात जी काही व्यवस्था निर्माण केली, त्यात महत्वाचं नाव वाल्मिक कराड हे होते. त्याला कार्यकारी पालकमंत्रीही म्हटलं जायचं, असा दावाही साळुंखे यांनी केला.
खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड हा आरोपी आहे. तसेच, देशमुख खून प्रकरणातील आरोपींशी त्याचे लागेबांधे आहेत, हे तपासात स्पष्ट झाले आहे, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की कोणी कितीही जवळचा असला तरी आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करू, असेही सोळुंखे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, माझे मुंडे कुटुंबीयांशी जवळचे संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की, धनंजय मुंडेंचे जवळचे सहकारी म्हणून आम्ही वाल्मिक कराडकडे बघत होतो. पण त्याचा कारभार खंडणी मागणे, दहशत निर्माण करणे, अवैध धंद करणे, असा असेल असे कधीही वाटले नव्हते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर धनंजय मुंडेंच्या सर्व काही गोष्टी आलेल्या आहेत, त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घ्यायची की आणखी काही करायचे याचा निर्णय त्यांनी घ्यावा. बीडचं प्रकरण काय आहे, या प्रकरणात कोणी दोषी आहे, हे त्यांना माहिती नाही का, त्यांनी योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षाही धनंजय मुंडेंनी व्यक्त केली.
अजितदादांना फोन केला; पण...
संतोष देशमुख खून प्रकरणी गेली 19 दिवसांपासून आरोपीला पकडले जात नाही, त्यामुळे काय बोलावे हेच कळत नाही. मध्यंतरी मी अजित पवार यांना फोन करून या प्रकरणातील आरोपींना अटक होत नसल्याने बीड जिल्ह्यातील लोकांच्या मनात फार मोठा उद्रेक आहे, त्यासाठी तुम्ही तातडीने काहीतरी प्रयत्न करा, अशी मी त्यांना विनंती केली होती. त्यालाही आता पाच ते सहा दिवस झाले आहेत. देशमुख खून प्रकरणाला अजिबात गती नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आरोपींना कधी अटक होईल, हा मोठा प्रश्न आमच्या सर्वांच्या मनात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.