Beed, 07 August : मधल्या काळात आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी झाली आहे, त्यातून आपल्याला सावरावे लागेल. चुका सुधाराव्या लागतील. जे चुकत असतील, त्यांना शासन (शिक्षा) करावं लागेल. सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्षाचा असूद्या. नात्यागोत्याचा, जातीपातीचा अजिबात विचार करू नका, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. जो चुकीचं वागेल, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या दौऱ्यावर असतानाच केले आहे, त्यामुळे अजितदादांचा रोख नेमका कोणाकडे आहे, अशी चर्चा रंगली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) हे आज (ता. ०७ ऑगस्ट) बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी सभेत बोलताना अजित पवारांनी मधल्या काळात घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे अप्रत्यक्षपणे सुचविले आहे.
ते म्हणाले, बीड जिल्ह्याची मध्यंतरी बदनामी झाली आहे, त्यातून आपल्याला बाहेर पडावे लागेल. ज्या चुका आहेत, त्यात सुधारणा करावी लागेल. जो चुकेल, मग तो कोणीही असू द्या. कुठल्याही पक्षाचा असू द्या. सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्षाचा असूद्या. त्यांना संविधानाच्या नियमानुसार, घटनेच्या माध्यमातून शिक्षा झाली पाहिजे, कायदा सर्वांना सारखा आहे, कोण मोठा आणि कोठ छोटा नाही, त्यामुळे बीडची (Beed) कायदा आणि सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी आपण (जनतेला उद्देशून) मदत करावी.
कोणी चुकीचे वागत असेल, तर त्याला समजावून सांगा. त्याला म्हणावं, पालकमंत्र्यांनी सांगितलंय, आता सरकार ऐकणार नाही. चुकीचं काही कोणी करू नका. ते केलं तर आम्ही सहन करू, असं होणार नाही. आम्हाला वाकड्यात जायला लावू नका. माझ्यासकट सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे, हे माझं तुम्हाला आवाहन आहे, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.
जर कोणी ऐकलं नाही तर एकदा, दोनदा आणि तीनदा सांगू. त्यांनी ऐकलंच नाही तर त्याला मकोका लावू. मग, चक्की पिसिंग ॲंड पिसिंग मग आतमध्ये जाऊन बस. मग त्याचे काही चालणार नाही. आपल्या सगळ्यांना नीटपणे काम करायचे आहे. त्या कामात कोणी अडथळा आणत असेल, तर वेगळे काही घडविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला बळी पडण्याचे काम बीडमधील जनतेने करू नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
बारामती, पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरात झालेले कामे बीडमध्ये करण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. त्यासाठी तुमची साथ लागणार आहे. बीड जिल्ह्यात चांगल्यातील चांगले अधिकारी देण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. त्या अधिकाऱ्यांनीही जबाबदारीने जनतेशी वागलं पाहिजे. उगीच हेलपाट्यात जनतेला अडकवू नका. जनतेच्या आणि लोकप्रतिनिधींच्या चांगल्या काही गोष्टी असतील तर त्यातील चांगल्या गोष्टींचं आम्ही स्वागत करू. आम्ही त्या दुर्लक्षित करणार नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.