
Solapur, 07 August : लोकसभा निवडणुकीत भाजपपासून लांब राहिलेले पक्षाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील आणि भाजपचे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे तब्बल सतरा महिन्यांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत झालेल्या होलार समाजाच्या मेळाव्यात हे चित्र पाहायला मिळाले. व्यासपीठावर एकत्र आलेल्या या दोन्ही नेत्यांनी मात्र एकमेकांकडे पाहिलेसुद्धा नाही.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले हे दोन दिवसांपूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे नुकताच ता. 05 ऑगस्ट रोजी होलार समाजाचा मेळावा झाला. त्या मेळाव्याला आमदार उत्तम जानकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार नारायण पाटील, माजी आमदार राम सातपुते उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीपासून सातत्याने रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांच्यावर टीका करणारे राम सातपुते हे एकत्र आले होते. मेळाव्याबरोबरच शिवसेना तालुकाप्रमुखाच्या हॉटेलच्या उद्घाटनाला हे दोन्ही नेते आवर्जून उपस्थित होते.
हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राम सातपुते (Ram Satpute) आणि मोहिते पाटील यांच्या मध्ये दोन्ही मंत्री म्हणजेच संजय शिरसाट आणि भरत गोगावले बसले होते. तसेच, मेळाव्यातही दोघे फटकून वागत होते. जवळपास दीड वर्षांनी एकत्र आलेल्या भाजपच्या या दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे पाहिलेसुद्धा नाही. पण, जवळपास दीड वर्षानंतर भाजपतील हे दोन्ही नेते एकत्र आले होते.
दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून मोहिते पाटील आणि भाजपमध्ये बिनसले होते. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. पण, भाजपकडून डावलण्यात आल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवून जिंकली होती. त्यावेळी तसेच विधानसभा वेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप आणि राष्ट्रवादीपासून चार हात दूर राहणे पसंत केले होते.
विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यांच्यामुळे आपला पराभव झाला, असा आरोप करत मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राम सातपुते यांनी हायकमांकडे केली होती. उत्तम जानक यांना निवडून आणण्यात रणजितसिंहाचा वाटा आहे, असा दावा राम सातपुते यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीनुसार मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. मात्र, पक्षाने त्यांच्यावर अजूनही कारवाई केलेली नाही.
विधानसभेत महायुतीला बहुमत मिळाले आणि ती पुन्हा सत्तेवर आली. दरम्यानच काळात आमदार मोहिते पाटील हे पुन्हा भाजपमध्ये सक्रीय झाले आहेत. त्यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनाही प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, त्यांनी मोहिते पाटील अजूनही भाजपचे आमदार आणि सदस्य आहेत, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे महायुती आणि भाजप मंत्र्यांच्या कार्यक्रमाला मोहिते पाटील आवर्जून उपस्थिती लावत आहेत.
भारतीय जनता पक्षात एकत्र असलेले हे दोन्ही नेते एकमेकांशी संवाद तर सोडा; एकमेकांकडे बघतही नाहीत, त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे एकाच व्यासपीठावर एकत्र येणे हे महत्वपूर्ण ठरते. आता हे दोन्ही नेते एकमेकांशी जुळवून घेणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.