Chhatrapati Sambhajinagar, 13 July : छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन दिवसांपूर्वी 1984 ते 90 च्या दरम्यान डाॅन म्हणून प्रसिद्ध झालेल्या बाबा फर्जन याच्या बंगल्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांच्या हाती साडेपाच कोटींची रोख रक्कम, बंदूका, सहा हजार काडतुसं, तलवारी, गुप्त्या व इतर घातक शस्त्र सापडली. विशेष म्हणजे बाबा फर्जन याच्या मृत्यूनंतर महिनाभराने ही कारवाई झाली. यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत रोख रकमेचा आकडा पोलिस लपवत आहेत, असा आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनीही शिरसाट यांच्या मताला सहमती दर्शवली. बाबा फर्जन याच्या घरात पाच कोटी नाही, तर अधिकची रक्कम सापडली असावी, असा दावा या दोन्ही नेत्यांनी केला आहे. त्या संदर्भात पोलिस आयुक्तांशीही त्यांनी चर्चा केली आहे.
नव्वदच्या दशकात डाॅन म्हणून परिचित असलेल्या बाबा फर्जन याने 1990 मध्ये शिवसेनेचे औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. अपक्ष लढलेल्या बाबा फर्जन याला तेव्हा फक्त सहा हजार मते मिळाली होती.
शिवसेनेच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढलेल्या बाबा फर्जन याच्याबद्दल शिवसेनेला एवढी सहानुभूती का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहराची सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे.
रझाकारांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढा देणारा प्रदेश म्हणून हे शहर ओळखले जाते. 1984 ते 1990 चा काळ या शहरासाठी मोठ्या संघर्षाचा होता. जातीय तणाव, दंगलीला सामोरे जात दोन समाज एकमेकांच्या विरोधात ठाकल्याने संभाजीनगर कायम संवेदनशील शहर म्हणून ओळखले जायचे.
या काळात हिंदूंच्या बाजूने जो कोणी उभा राहिल, तो 'मसिहा' समजला जायचा. 1986 मध्ये संभाजीनगरमध्ये जेव्हा जातीय दंगल उसळली तेव्हा शहरातील संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोटाकारंजा भागात बाबा फर्जनचे घर होते. दंगेखोर घरावर हल्ला करायला आले तेव्हा बाबा फर्जनने त्याच्याकडे असलेल्या एअरगनने हवेत फायरिंग केली आणि दंगेखोरांना हुसकावून लावले. तेव्हापासून बाबा फर्जनची दहशत शहरात पसरली. हिंदुत्ववादी संघटना आणि नेत्यांमध्ये त्याची उठबस होती. या शिवाय कामगार संघटनांच्या माध्यमातून बाबा फर्जन याने कामगार क्षेत्रात आपला जम बसवला होता.
शिवसेनेचे तेव्हाचे संस्थापक जिल्हाप्रमुख आणि कामगार नेते सुभाष पाटील आणि बाबा फर्जन यांच्यामध्ये व्हिडिओकाॅन या कंपनीतील कामगार युनियनवरून संघर्षाचा भडकला होता. नंतर दोघांनी जुळवून घेतले आणि तिथे दोघांच्या संघटना कार्यरत राहिल्या. शहरात जातीय तणाव किंवा दंगलीची परिस्थिती उद्भवली की बाबा फर्जन हा शिवसेनेच्या नेत्यांसोबत असायचा.
1986 च्या दंगलीनंतर पोलिसांनी जेव्हा धरपकड सुरू केली तेव्हा चंद्रकांत खैरे, विनायक बावस्कर, बाबा फर्जन यांना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा फरार असलेल्या सुभाष पाटील यांना नंतर ‘रासुका’खाली अटक करण्यात आली होती.
शिवसेनेकडे विधानसभेची उमेदवारी मागितली..
कायम शिवसेनेशी जवळीक राखून असलेल्या आणि स्वतःची हिंदू डाॅन अशी प्रतिमा तयार करणाऱ्या बाबा फर्जन याने 1990 च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पश्चिममधून शिवसेनेकडे उमेदवारी मागीतली होती. परंतु तेव्हाच्या स्थानिक नेत्यांनी फर्जन याचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे संतापलेल्या बाबा फर्जन याने शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. तेव्हा त्याला केवळ 6009 एवढी मते मिळाली होती.
निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर बाबा फर्जन याने आपली कामगार संघटना आणि बंदूक, काडतुसं विकण्याच्या आपल्या व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे बोलले जाते. बाबा फर्जन याच्याकडे बंदूक व त्याच्या गोळ्या विकण्याचा अधिकृत परवाना होता, असाही दावा केला जातो.
एकूणच बाबा फर्जन शिवसेनेच्या अगदी जवळ होता, त्यामुळेच त्याच्या मृत्यूनंतर झालेली कारवाई, त्यात सापडलेले कोट्यावधी रुपये यावरून संजय शिरसाट, अंबादास दानवे, सुभाष पाटील या नेत्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. सुभाष पाटील यांच्या दाव्यानुसार बाबा फर्जन याच्या बंगल्यात किमान वीस ते पंचवीस कोटी रुपये होते, अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.