Amit Deshmukh & Dhiraj Deshmukh News Sarkarnama
मराठवाडा

Latur City Assembly Constituency 2024 : अमित देशमुखांना पुन्हा बाय ? की महायुती तगडा उमेदवार देणार

Jagdish Pansare

Latur Congress News : लातूर शहर आणि ग्रामीण या दोन विधानसभेच्या मतदारसंघावर गढीच्या देशमुखांची पकड वर्षानुवर्षे कायम आहे. 2008 नंतर या मतदारसंघाचे शहर आणि ग्रामीणमध्ये विभाजन झाले सत्ता केंद्र मात्र देशमुखांकडेच राहिले. लातूर जिल्ह्यात या दोन मतदारसंघातील लढतीकडे नेहमीच संशयाने बघितले जाते. हे दोन मतदारसंघ सोडा, बाकी सगळा जिल्हा तुम्ही घ्या, अशा अलिखीत करारच देशमुख आणि त्यांच्या विरोधकांमध्ये झाल्याची चर्चा जिल्ह्यात नवी नाही.

या दोन्ही मतदारसंघामध्ये अमित आणि धीरज देशमुख या दोन भावांविरुद्ध दिल्या जाणाऱ्या उमेदवारांवर नजर टाकली तर ते पटते देखील. मतदारसंघाचे विभाजन होण्याआधी विलासराव देशमुख यांनी लातूर मतदारसंघातून सहा वेळा निवडणूक लढवली होती. (Latur) पैकी पाच वेळा ते निवडून आले, तर 1995 मध्ये जनता दलाच्या शिवाजी कव्हेकर यांनी त्यांना पराभूत करत धक्का दिला होता. विलासराव देशमुख यांच्या पराभवाची चर्चा तेव्हा राज्यभरात झाली होती.

2008 नंतर लातूर मतदारसंघाचे शहर आणि ग्रामीण असे विभाजन झाले आणि विलासराव यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या अमित आणि धीरज देशमुख या दोघांची सोय झाली. लातूर शहरमधून अमित देशमुख यांनी आतापर्यंत तीन वेळा विजय मिळवला आहे. 2009 मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत अमित देशमुख यांनी बसपाच्या उमेदवाराचा पराभव करत विधानसभेत एन्ट्री केली होती.

शिवसेनेच्या श्रीपाद उर्फ पप्पू कुलकर्णी हे तिसऱ्या क्रमांकावर होते, त्यांनी वीस हजार मते घेतली होती. आता कुलकर्णी यांची उमेदवारी देशमुखांना मदत व्हावी यासाठी होती की बसपाच्या कय्युमखान पठाण यांची ? यावर तेव्हा बरीच चर्चा झाली होती. (Amit Deshmukh) अमित देशमुख यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्ममध्ये या मतदारसंघातून भाजपने निवडणूक लढवली. या दोन्ही वेळी त्यांनी शैलेश लाहोटी यांना मैदानात उतरवले आणि त्याचा अपेक्षित परिणाम झाला.

2014 मध्ये शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सगळेच स्वतंत्र लढले. तरीही अमित देशमुख 49 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा अमित देशमुख यांच्याविरोधात शैलेश लाहोटी या पराभूत उमेदवारालाच मैदानात उतरवले. वंचितच्या उमेदवाराने 24 हजाराहून अधिक मते घेतली आणि अमित देशमुख यांनी 40 हजारांच्या फरकाने विजयाची हॅट्रीक केली.

लातूर ग्रामीण मतदारसंघावर 2009 पासून काँग्रेसचे वर्चस्व आहे. वैजनाथ शिंदे, त्र्यंबक भिसे आणि आता धीरज देशमुख या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. गेल्या निवडणुकीत धीरज देशमुख यांची विधानसभेती एन्ट्री अशीच रंजक आहे. सलग दोन टर्म लढलेल्या भाजपने अचानक ही जागा शिवसेनेला सोडली. सचिन देशमुख यांना मैदानात उतरवण्यात आले, पण लिंबू टिंबू उमेदवार द्यायचे आधीच ठरल्याने त्यांची गाडी साडेतेरा हजार मतांवरच थांबली.

त्यांच्यापेक्षा नोटाला अधिक मते मिळाली. तब्बल साडेसत्तावीस हजार मते नोटाला मिळाली. हा धीरज देशमुख यांना निवडून आणण्याच्या रणनितीचाच एक भाग होता. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी तेव्हा सेटलमेंटचे राजकारण झाल्याचा केलेला आरोप चर्चेचा विषय ठरला होता.

आता 2024 ची विधानसभा निवडणुक दोन महिन्यावर आली आहे. मात्र अजूनही अमित आणि धीरज देशमुख यांच्याविरोधात महायुतीचा उमेदवार कोण ? हे निश्चित झालेले नाही. लातूर ग्रामीणमधून भाजपचे विधानपरिषदेतील आमदार रमेशअप्पा कराड यांनी मीच उमेदवार असा दावा केला आहे. लातूर शहरमधून कोण ? याची चर्चा मात्र अजूनही नाही.

एकूणच लातूरमधील शहर आणि ग्रामीण या दोन्ही मतदारसंघाबाबत विरोधी पक्षांची भूमिका कायम संशयास्पद राहिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून लातूरमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर तरी महायुती देशमुखांविरोधातील रणनिती बदलणार का ? की पुन्हा लुटूपुटूची लढाई लढणार ? याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT