OBC Voters sarkarnama
मराठवाडा

Loksabha Elections 2024 : राजकीय अस्मिता जागृत झाल्याने ओबीसी मते ठरणार गेम चेंजर?

Prasad Shivaji Joshi

Parbhani News : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटप आणि उमेदवारांची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन दिवसांत या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे मतांचे गणित बिघडले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत असण्याची शक्यता आहे. तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी मतदार एकवटल्याचे चित्र आहे.

ओबीसी मतदारांनी एकगठ्ठा मतदान केले, तर राजकीय गणिते बिघडू शकतात. निवडणुकीच्या मैदानात मतांच्या गणितावर सर्व काही अवलंबून असते. हिंदुत्व, राम मंदिर यांसारख्या मुद्द्यांवर मतांचे ध्रुवीकरण होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना आरक्षणाच्या मुद्द्याने समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण केला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी प्रवर्गात असुरक्षितता निर्माण झाली. राजकीय नेत्यांनी राज्याच्या विविध भागात ओबीसी मेळावे आयोजित केले.

या मेळाव्यामधून ओबीसी प्रवर्गाची राजकीय अस्मिता जागृत करण्याचे प्रयत्न झाले. ओबीसी मतदारांनी अन्य कोणालाही मतदान न करता केवळ ओबीसी उमेदवारास मतदान करावे, असेही जाहीर आवाहन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड . प्रकाश आंबेडकर यांनी परभणीतील एल्गार महासभेत आघाडीचे धोरण जाहीर केले. जो पक्ष राज्यातील 14 लोकसभा मतदारसंघात ओबीसी उमेदवार देईल, तोच आपला पक्ष असे ठणकावून सांगितले.

त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा पाठीराखा असलेला दलित मुस्लिम मतदार ओबीसी उमेदवाराच्या पाठीमागे असेल हे स्पष्ट आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनीही हाच धागा पकडत राज्याच्या मुख्यमंत्रिपदीसुद्धा ओबीसी उमेदवारच असेल, असा दावा केला आहे. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते.

त्यानुसार राज्य सरकारने मराठा समाजासाठी वेगळे दहा टक्के आरक्षण दिले आहे. या निर्णयामुळे ओबीसी महासंघाने राज्य सरकारचे अभिनंदन केले होते. याचा मोठा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो. मात्र, त्याच वेळी ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षणाची मागणी करणाऱ्या मतदारांच्या नाराजीचाही सामना करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर ओबीसी मतदारांचा कल कोणाकडे असेल हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात तरी ओबीसी मतदार हा गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT