Sambhajinagar Loksabha Constituency Sarkarnama
मराठवाडा

Sambhajinagar Loksabha Constituency : छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिंदे- फडणवीस अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडणार?

Jagdish Pansare

Marthwada Political News : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नऊ जागा द्या, अशी मागणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने भाजपकडे केली असल्याची चर्चा आहे. या नऊ जागांसाठी कोण उमेदवार असतील, कुठले मतदारसंघ असतील याची संभाव्य यादीही माध्यमांसमोर आल्याचा दावा केला जात आहे. (Sambhajinagar Loksabha Constituency) त्यानुसार छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांचे विश्वासू विद्यमान मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

खरंतर चव्हाण हे गेल्या वर्षभरापासून संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर- खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी करत आहेत. परंतु (NCP)राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बदलत्या घडामोडीत सतीश चव्हाण यांना लोकसभा लढवण्याची गळ घालण्यात आल्याचे बोलले जाते. (Shivsena) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळीच सतीश चव्हाण दंड थोपटून उभे होते, परंतु आघाडीमध्ये ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसकडे असल्यामुळे सतीश चव्हाण यांचा पत्ता कट झाला होता.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर सतीश चव्हाण यांनी भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्या गंगापूर- खुलताबाद मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे. (Marathwada) या मतदारसंघात आमदार निधीतून अनेक कामे करत चव्हाण यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, आता थेट संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांचे नाव पुढे आल्यामुळे आता गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील विधानसभेच्या तयारीचे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद फारशी नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीला मर्यादित प्रतिनिधित्व आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पदवीधर व शिक्षक वगळता एकही आमदार नाही. शिवसेना-भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादीचे संघटन म्हणावे तितके मजबूत नाही. तरीही केवळ मराठा उमेदवार म्हणून सतीश चव्हाण यांच्यासाठी अजित पवार आग्रही असल्याचे बोलले जाते.

दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपनेही दावा सांगितला आहे. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे आहे. ठाकरे गटाकडून गेल्या निवडणुकीत अवघ्या पाच हजार मतांनी पराभूत झालेल्या चंद्रकांत खैरे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यापैकी ही जागा कोण लढवणार ? यावरच छत्रपती संभाजीनगरातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT