Raosaheb Danve, Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

Raosahebe Danve v/s Abdul sattar News : सत्तार- दानवे यांच्यात फुटणारे फटाके आवाज करणार का?

Will the alliance leaders stop Sattar-Danve? : सिल्लोड- सोयगाव मतदार संघात महायुती म्हणजेच भाजपकडून दगाफटका झाला तर त्याला जशास तसे उत्तर भोकरदन, कन्नड, फुलंब्रीसह जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात दिले जाईल, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनेचे मंत्री आणि सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा थेट इशारा दिला आहे. सिल्लोड मध्ये युती धर्म पाळला तर मी देखील युती धर्म पाळेल, नाहीतर कन्नड, भोकरदन आणि सिल्लोड मध्ये फटाके वाजवणारच, अशा शब्दात आव्हान दिले आहे. यावर रावसाहेब दानवे यांना छेडले तेव्हा त्यांनी सत्तारांचा उल्लेख पुन्हा औरंगजेब असा करत स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली.

`सत्तार काय बोलतात ते सोडा, औरंगजेब काय बोलला ते मला शिवाजीला का विचारतात`? अशा त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Abdul Sattar) सत्तार आणि दानवे यांच्यात दिवाळीमध्ये सुरू असलेले धमाके विधानसभा निवडणुकीत खरंच आवाज करणार की मग फुसका बार ठरणार ? हे 23 नोव्हेंबर नंतरच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

तूर्तास महायुतीतील या दोन मोठ्या नेत्यांमध्ये चांगलीत जुंपल्याचे चित्र आहे. सिल्लोड- सोयगाव मतदार संघात महायुती म्हणजेच भाजपकडून दगाफटका झाला तर त्याला जशास तसे उत्तर भोकरदन, कन्नड, फुलंब्रीसह जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात दिले जाईल, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला आहे. यासंदर्भात रावसाहेब दानवे यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सत्तार काय बोलतात ते सोडा औरंगजेब काय बोलतो हे माझ्या हे मला शिवाजीला का विचारता? असे म्हणत सत्तार यांच्यावर टीका केली.

मात्र यातून नवाच वाद सुरू झाला आहे. (Raosaheb Danve) रावसाहेब दानवे यांनी स्वतःची तुलना शिवाजी महाराजासोबत केल्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी आता सुरू झाली आहे. सत्तार- दानवे यांच्यातील संघर्षामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये महायुतीला फटका बसू शकतो. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची परतफेड रावसाहेब दानवे जालना विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर आणि सिल्लोड सोयगाव मध्ये अब्दुल सत्तार यांना पराभूत करून करू पाहत आहेत.

जालना लोकसभा निवडणुकीच्या वेळी या दोघांनी युती धर्म न पाळता रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप आहे. अब्दुल सत्तार यांनी याची जाहीर कबुलीच दिली होती. तर अर्जुन खोतकर यांचाही एक कथित ऑडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. रावसाहेब दानवे हे मुरब्बी राजकारणी आहेत. विरोधकाला ते कधीच सोडत नाही, असा त्यांचा पूर्व इतिहास असल्याने या विधानसभा निवडणुकीत खोतकर- सत्तार यांच्या विरोधात त्यांची खेळी महत्त्वाची समजली जात आहे.

दुसरीकडे अब्दुल सत्तार यांची उपद्रवशक्ती पाहता ते ही रावसाहेब दानवे यांची खेळी उलटवण्यासाठी जोर लावणार यात शंका नाही. असे झाले तर सिल्लोड, भोकरदन, कन्नड, फुलंब्रीसह इतर जिल्ह्यातील काही मतदारसंघात महायुतीला फटका बसू शकतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होण्याआधी राज्यातील वरिष्ठ नेते या दोन नेत्यांमधील वाद कसा सोडवतात? यावर बरेच अवलंबून असणार आहे.

कन्नड विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत. भोकरदन मध्ये संतोष दानवे तिसऱ्यांदा मैदानात आहेत तर फुलंब्री विधानसभा मतदारसंघात महायुतीने भाजपच्या अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. मात्र अब्दुल सत्तार यांनी या सर्वच मतदारसंघामध्ये आपल्या समर्थकांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायला लावून दबाव तंत्राचा वापर केला आहे.

सत्तार समर्थक अपक्ष मैदानात..

कन्नडमध्ये संजना जाधव यांना महायुतीकडून अधिकृत उमेदवारी मिळाली असली तरी स्थानिक शिवसेना नेत्यांनी त्यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे. यामागे अब्दुल सत्तार हेच असल्याचे बोलले जाते. इकडे फुलंब्री मध्ये महायुतीच्या अनुराधा चव्हाण यांच्या विरोधात सत्तार यांनी आपले समर्थक किशोर बलांडे यांना उमेदवारी अर्ज दाखल करायला लावून रसद पुरवण्याची तयारी सुरू केली आहे. भोकरदन मध्ये संतोष दानवे यांना पाडण्याचा इशारा देत सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्या खेळीला डॅमेज करण्याची पुरेपूर तयारी केल्याचे दिसते.

महायुतीतील या दोन नेत्यांनी उपसलेल्या तलवारी म्यान करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लावतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे सध्या दिवाळीमध्ये अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यात सुरू असलेला हा धमाका आवाज करणारा ठरतो की मग वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्तीनंतर फुसका बार ठरतो ? याकडे महायुतीसह महाविकास आघाडी डोळे लावून बसली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT