Dhnanjay Munde-Pankaja Munde News
Dhnanjay Munde-Pankaja Munde News Sarkarnama
मराठवाडा

Pankaja-Dhnanjay Munde News : भगवान गडावर मुंडे बहिण-भावाने केलेला संकल्प पुर्णत्वास जाणार का ?

सरकारनामा ब्युरो

Maharashtra : राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी सुरू केलेल्या ८९ व्या अखंड हरिनाम नारळी सप्ताहाची सांगता आज भारजवाडी ता. पाथर्डी येथे हजारोंच्या संख्येने झाली. (Pankaja Munde) पंकजा आणि धनंजय मुंडे या बहिण-भावांची एकत्रित या सोहळ्याला असलेली हजेरी राज्याच्या राजकारणात वेगळ्याच चर्चेचा विषय ठरत आहे. भगवान बाबांच्या साक्षीने एकमेकांमधील कडवटपणा नाहीसा करण्याचा संकल्प या बहिण-भावाने घेतला.

राजकीय व्यासपीठ नाही हे सांगत दोघांनी घेतलेला हा मोठा राजकीय निर्णय, संकल्प येणाऱ्या काळात ते पुर्णत्वास नेतात का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. (Beed News) भगवान गडावर पकंजा आणि धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांना एकत्रित पाहून त्यांच्या समर्थकांना हायसे वाटले. आता या दोघांमधील कडवटपणा कमी करण्यासाठी कोण पुढाकार घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागणार आहे.

२०१९ मध्ये झालेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून एकमेकांविरुद्ध लढल्यानंतर पंकजा मुंडे पराभूत झाल्या आणि तिथूनच या दोघांमध्ये कडवटपणा आला. दोघांनीही वैचारिक मतभेद असल्याचे मान्य केले, पण कौटुंबिक मनभेद नसल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलटी आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा, प्रितम या बहिण भावांडामध्ये प्रचंड राजकीय मतभेद गेल्या अडीच तीन वर्षात निर्माण झाले आहेत.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांच्या कारभाराचे या दोघींनीही वाभाडे काढल्याचे सगळ्यांनी पाहिले. कोरोना काळात तर धनंजय यांच्यावर गंभीर आरोप देखील करण्यात आले होते. कायदा व सुव्यवस्था, बीड जिल्ह्यातील गुंडगिरी, अवैध धंदे याचा पाढा वाचला गेला. आताही संधी मिळेल तेव्हा दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होतच असतात. त्यामुळे भगवान गडावर केलेला संकल्प जर पुर्णत्वास न्यायचा असेल तर कुणा एकाला दोन पावले मागे यावे लागेल.

यासाठी कोण पुढाकार घेणार? यावरच कडवडपणा खरंच नाहीसा होणार का हे अवलंबून असणार आहे. वर्षभरावर लोकसभा आणि त्यानंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात आता परळीतून २०२४ च्या तयारीला लागा असे आवाहन केले होते. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा परळीत मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना होण्याची शक्यता आहे.

लोकसभेला विरोधक म्हणून बहिण प्रीतम मुंडे यांच्याविरोधात धनंजय यांना काम करावे लागणार आहे. त्यामुळे कितीही आणाभाका घेतल्या तरी राजकारणात या बहिण भावांमध्ये असलेला कडवटपणा कसा जाणार? हा खरा प्रश्न आहे. पण नारळी सप्ताहाच्या निमित्ताने का होईना पंकजा-धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर येवून कडवडपणा दूर करण्याचा संकल्प हाती घेतला हे ही नसे थोडके, असेच म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT