Dnyanraj Chaugule-Abhimanyu Pawar-Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Latur News : फडणवीसांच्या आशीर्वादाने पवार-चौगुलेंनी ‘किल्लारी’चे शिवधनुष्य पेलले; पण...

कारखाना सुरू झाला असला तरी उसाचे काय? किती शेतकरी विश्वास टाकून ऊस देतील? शेतकऱ्यांना तो विश्वास देण्‍याचेही आव्हान असेल.

सरकारनामा ब्यूरो

विक्रम पाठक

सोलापूर : ‘जो आला, त्याने कारखाना खाल्ला’ अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून ज्या कारखान्याबाबत उमटते, तो म्हणजे किल्लारी (Killari) येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना (Sugar factory). औशाचे आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) आणि उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले (Dnyanraj Chaugule) यांनी हा बंद पडलेला कारखाना सुरू करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आशीर्वादाने या कारखान्याचे धुराडे पुन्हा पेटले आहे. मात्र, भविष्यात तो सुरू ठेवण्याचे आव्हान मोठे आहे. ते आव्हान या दोन आमदारांना पेलते का, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. (With the help of Fadnavis, Abhimanyu Pawar- Dnyanraj Chaugule started Killari Sugar factory)

सुमारे दहा वर्षांपासून बंद पडलेला, मशिनरी खराब झालेला किल्लारीचा कारखाना आता सुरू होऊच शकत नाही, असे वाटत होते. तसा अहवालही वेळोवळी आलेल्या अवसायक मंडळांनी सरकारला दिला होता. कारखान्याची बरीचशी अचल संपत्तीही गहाण आहे. विविध बँकांचे ३३ कोटींहून अधिक कर्ज कारखान्यावर आहे. अशा परिस्थितीत कारखाना सुरू करण्यासाठी कोणीही तयार नव्हते. यापूर्वीही अनेकांनी हात टेकले होते.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवार आणि चौगुले यांनी पाठपुरावा केला. हा कारखाना सुरू करणे, कसे गरजेचे आहे, हे त्यांना पटवून दिले. त्यानंतर सरकारने आधीचे अवसायक मंडळ रद्द करून दोन शासकीय अधिकाऱ्यांना अवसायक नेमले. त्यांनी सभासदांची बैठक घेतली. हा कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यातच राहावा, सहकारी तत्‍वावरच चालावा यासाठी पवार, चौगुलेंनी सभासदांना साकडे घातले. शेअर्सच्या माध्यमातून पावणेदोन कोटीहून अधिक रक्कम जमा केली.

कारखाना सुरू करण्यासाठी दहा कोटीहून अधिक रक्कम लागणार होती. ती रक्कम हातउसने करून जमा केल्याने कारखाना कसाबसा सुरू तर झाला. काही पोते साखर निर्मितीही झाली. मात्र पुढे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

शेतकरी विश्वास टाकून ऊस देतील काय?

कमी क्षमतेचा कारखाना चालवणे परवडणार नाही. म्हणून त्याची क्षमता वाढवावी लागेल. बायप्रॉडक्ट काय? ६० टक्के इथेनॉल व ४० टक्के साखर निर्मितीचे नियोजन असल्याचे आमदार पवार सांगतात. पण, ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी अनेक दिव्य संकटांतून जावे लागणार आहे. जुन्या गंजलेल्या मशिनरी किती दिवस साथ देतील, हा प्रश्नच आहे. कारखाना सुरू झाला असला तरी उसाचे काय? किती शेतकरी विश्वास टाकून ऊस देतील? शेतकऱ्यांना तो विश्वास देण्‍याचेही आव्हान असेल.

साखरेचा गोडवा कायम राहावा

बंद पडलेल्या कारखान्याची दुरुस्ती सुरू केल्यापासून १११ व्या दिवशी मोळीपूजन झाले. युद्ध स्तरावर कारखान्याची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यात आली. आता काही पोते साखरही बाहेर पडली असली तरी या साखरेचा गोडवा औसा, उमरगा, निलंगा, लोहारा तालुक्यात कायम राहावा, हीच शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

सरकार आमचेच; कारखाना चालवून दाखवू

बंद पडलेला कारखाना पुन्हा सहकारी तत्त्वावर सुरू होण्याचे किल्लारी हे पहिलेच उदाहरण आहे. मी आणि आमदार चौगुले यांनी पाठपुरावा करून हे आव्हान पेलले आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या धोरणानेच कारखाना चालेल. सरकार आमचेच आहे, त्यामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करून कारखाना चालवू, असा विश्वास आहे, आमदार अभिमन्यू पवार यांनी बोलून दाखविला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT