मुंबई : विधानभवनाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींच्या निविदा निघाल्या आहेत. मंत्र्यांची दालनं दुरुस्त होत आहेत. सोफे बदलेले जात आहेत, पेटिंग केले जात आहे. हे सर्व करा, त्याबाबत माझे काहीही म्हणणे नाही. पण, मागणी केलेली असतानासुद्धा तुम्ही मला हिकरणी कक्षाची सुविधा देऊ शकत नाही. माझ्यासाठी नाही, पण माझ्या बाळासाठी द्या हो. जेणेकरून तो सुरक्षित राहिला, तर मी मतदारसंघासाठी काम करू शकेन, अशा शब्दांत देवळालीच्या राष्ट्रवादीच्या (NCP) आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनी आपल्या वेदना मांडल्या. (‘Not for me; But give facilities for my baby': MLA Saroj Ahire)
आपल्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन आमदार सरोज अहिरे अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुंबईत आल्या आहेत. मात्र, विधीमंडळ परिसरातील हिरकणी कक्षाची दुरवस्था पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. उद्यापर्यंत माझ्या बाळाची व्यवस्था नीट न झाल्यास आपण अधिवेशनाला उपस्थित राहू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
आमदार अहिरे म्हणाल्या की, मी माझे कर्तव्य बजावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आले आहे. देवळाली मतदारसंघातील जनतेच्या आशीवार्दामुळे मी शून्यातून इथपर्यंत आले आहे. मी गरोदर असतानाही मी कामकाजात सहभागी होण्यासाठी येत होते. मागील अधिवेशनात नागपूरला मी माझ्या बाळाला घेऊन गेले हेाते.
मी आठ दिवसापूर्वी प्रधान सचिवांकडे हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांनी एक कार्यालय रिकामे करून देण्यात आले आहे. त्या ठिकाणी फक्त खुर्च्या-टेबल आहेत. पलंग नाही, लहान बाळासाठीच्या सुविधा नाहीत. भाजपच्या केजच्या आमदार नमिता मुंदडाही त्यांच्या बाळाला घेऊन येणार आहेत. मग, आम्ही दोघी कोणाच्या भरवशावर आमच्या बाळाला ठेवून कामकाजात सहभागी व्हावे, असा सवालही आमदार अहिरे यांनी विचारला.
माझं बाळ आजारी आहे. सध्या त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत. त्याही परिस्थिती मी त्याला घेऊन आलेले आहे. त्या कक्षातील घाणेरड्या ठिकाणी मी माझ्या बाळाला सोडून सभागृहात काम करू शकणार नाही. एक आई म्हणून त्याच्या आरोग्याची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे. मागील आठवड्यातही मी मंत्रालयातील कामासाठी आले होते. त्याचवेळी डॉक्टरांनी त्याला ‘बेड रेस्ट’ देण्यास सांगितले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाकडून मिळालेल्या वागणुकीमुळे आज मनाला प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे आजचा दिवस मी वाट बघेन. आज जर बाळाची व्यवस्था नीट नाही झाली, तर मी जनतेची हात जोडून माफी मागते. मी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहू शकत नाही. रडूनच मला काही तर मिळणार असेल मी रडते. पदर पसरते. मी आताच रडायला बसते. आमच्यावरील अन्याय दूर होतो का हे पाहू, अशी चीडही त्यांनी बोलून दाखवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.