Hasan Mushrif News : रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेला वाद्य अद्याप मिटलेला नाही. तोच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिमचे पालकमंत्री पद सोडले आहे. वयोमानानुसार लांबचा प्रवास शक्य नसल्याचे सांगत त्यांनी पालकमंत्रीपद सोडत असल्याची घोषणा केली.
मात्र कोल्हापूर हा स्वतःचा जिल्हा सोडून वाशिमसारख्या 630 किलोमीटर अंतरावरील काहीसा छोटा जिल्हा मिळाल्याने ते आधीपासूनच नाराज होते. ही नाराजी त्यांनी यापूर्वीही अनेकदा बोलून दाखविली होती. अखेर आज त्यांनी पालकमंत्रीपद सोडत या नाराजीवर अंतिम तोडगा काढला आहे.
पण मुश्रीफ यांच्याप्रमाणे नाराज असलेल्या पालकमंत्री म्हणून जुलमाचा राम राम सुरु असलेल्या मंत्र्यांची यादी मोठी आहे.
भाजपच्या 20 पैकी केवळ सात आणि शिवसेनेच्याही 12 पैकी सात मंत्र्यांनाच पालकमंत्री म्हणून गृह जिल्हा मिळालेला आहे. यातही राष्ट्रवादीचे मंत्री कमालीचे नाराज आहेत. पुणे अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवले आहे. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या लेकीला रायगडचे पालकमंत्रिपद मिळवून दिले.
पुढे तटकरे यांच्या या नियुक्तीला स्थगिती मिळाली तो भाग वेगळा. पण राष्ट्रवादीच्या उर्वरित आठ मंत्र्यांना स्वजिल्हे मिळालेले नाहीत. त्यामुळे मतदारसंघात कधी काम करायचं, मुंबईत कधी जायचं आणि पालकमंत्रिपद मिळालेल्या जिल्ह्यांचा कारभार कसा करायचा, असा प्रश्न मंत्र्यांना पडला आहे.
नाशिकच्या माणिकराव कोकाटेंना 195 किमीवरचा नंदूरबार, तर नरहरी झिरवाळ यांना 445 किमीवरचा हिंगोली जिल्हा दिला आहे. साताऱ्याच्या मकरंद पाटील यांना 440 किमीवरचा बुलढाणा तर शिवेंद्रराजे भोसले यांना 350 किलोमीटरवरचा लातूर जिल्हा मिळाला आहे.
त्याचवेळी लातूरच्या बाबासाहेब पाटील यांना 636 किमीवरचा गोंदिया जिल्हा दिला गेला आहे. भुसावळच्या संजय सावकारे यांना 600 किलोमिटर लांब भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. ठाण्याच्या प्रताप सरनाईक यांनाही 550 किलोमिटवरील धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री केले आहे.
उर्वरित मंत्र्यांना त्यांच्या आजूबाजूचाच जिल्हा मिळाला आहे. उदाहर द्यायचे झाल्यास बीडच्या पंकजा मुंडे यांना जालन्याचे, ठाण्याच्या गणेश नाईक यांना पालघरचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. पण या मंत्र्यांचे मनही मुश्रीफ यांच्याप्रमाणेच संबंधित जिल्ह्यांमध्ये रमलेले नाही. बहुतांश मंत्री 26 जानेवारीला झेंडा फडकावण्याची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्या-त्या जिल्ह्यांकडे फिरकलेलेच नाहीत.
गणेश नाईक यांच्यासारखे मंत्री पालक असलेल्या जिल्ह्यात सोडून स्वतःच्या जिल्ह्यात जनता दरबार सारखे उपक्रम राबवत आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे भरत गोगावले आणि दादा भुसे हे मंत्री नाराज आहेतच. पण पालकमंत्रीपद मिळूनही अनेक मंत्री नाराज आहेत. नरहरी झिरवाळ यांनी तर गरिबाला गरीब जिल्हा दिला आहे, असे म्हणत हिंगोलीबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
थोडक्यात नाराज पालकमंत्र्यांच्या नावाजी यादी मोठी आहे...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.