Rohit Pawar News : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे जावई अशोक जाधव यांनी शिक्षकाच्या नावावर कर्ज घेतले. मात्र, शिक्षक निवृत्त होऊनही ते फेडले नाही. शेवटी त्या शिक्षकाने विषप्रशान करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या संदर्भात रोहित पवार यांनी निवृत्त शिक्षकाच्या मुलीचा आणि रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या शिक्षकाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये रुग्णालयात भरती असलेले निवृत्त शिक्षक रमाकांत तांदळे यांच्या मुलीने सांगितले की, 'बाबासाहेब पाटील यांचे मोठे जावई अशोक जाधव यांनी दबाव टाकून माझ्या वडिलांच्या नावावर कर्ज घेतलं. माझे बाबा रिटायर होऊन पाच वर्ष झाले तरी ते कर्ज फेडत नाहीत. शिक्षक पतसंस्थेतून कर्ज काढलं, आम्ही बाबासाहेब पाटलांकडे हजार तक्रारी केल्या तरी ते एनओसी देत नाहीत. अशोक जाधव तुम्ही मरून जा म्हणून धमकी देतो. खोटे चेक दिले ते बाऊंन्स झाले.'
'आम्ही तक्रार करायला गेलो तर पोलिस सहकार्य करत नाहीत. माझ्या वडिलांनी विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना काही झाले तर त्याला बाबासाहेब पाटील, अशोक जाधव, तत्कालीन मुख्याध्यापक हनीफ सय्यद जबाबदार असतील. ', असे देखील व्हिडिओत म्हटले आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या जावयाने रमाकांत तांदळे या शिक्षकाच्या नावावर कर्ज काढून ते भरण्यास नकार दिल्याने आता निवृत्त झालेल्या या शिक्षकावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ आली… हे शिक्षक आज मृत्यूशी झुंज देत असतानाही पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसतील तर हे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसांच्या ब्रीदवाक्याला साजेसं आहे का?'
'नसेल दखल घ्यायची तर राज्याची पोलिस यंत्रणा केवळ सरकारमधील नेत्यांच्या वसुलीच्या कामासाठी आणि विरोधकांना त्रास देण्यासाठीच वापरली जाणार असं तरी एकदा सरकारने जाहीर करावं… माझी पोलिसांना विनंती आहे की, या प्रकरणाची शहानिशा करुन योग्य कारवाई करावी.', असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.