Pune News: ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याबरोबरच रोजगारनिर्मिती आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान’ अर्थात ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या अभियानात निवड होणाऱ्या प्रत्येक गावाला शाश्वत विकासासाठी १० लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
ग्रामीण भागातील पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, स्वच्छता आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी यांसारख्या मूलभूत सुविधांचा विकास करण्यावर या अभियानाचा भर आहे. विशेष म्हणजे केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहता कॉर्पोरेट कंपन्या, स्थानिक नागरिक आणि शासकीय यंत्रणा यांच्या सहभागातून गावांचा सर्वांगीण विकास करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गावांची निवड करताना शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक उत्पन्नाचे निर्देशांक विचारात घेतले जाणार आहेत. ज्या गावांमध्ये हे निर्देशांक तुलनेने कमी आहेत, अशा गावांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे प्रमाण अधिक असलेल्या आणि दलित, आदिवासी तसेच वंचित घटकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असलेल्या गावांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
अभियानासाठी पात्र गावांची प्राथमिक यादी तालुका आणि जिल्हा पातळीवर तयार केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित गावाच्या विकासासाठी सविस्तर आराखडा तयार केला जाईल. ग्रामसमितीची संमती घेऊन हा आराखडा पुढे नेला जाणार असून, महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन ही नोडल एजन्सी अंतिम पात्र गावांची यादी जाहीर करणार आहे.
ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे किंवा टँकरवर अवलंबून राहावे लागते, अशा गावांना अभियानातून निधी मिळू शकतो. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्राचा अभाव, दर्जेदार शाळांची कमतरता, डिजिटल कनेक्टिव्हिटीचा अभाव, खराब अंतर्गत रस्ते तसेच सांडपाणी व्यवस्थापनाची अपुरी सुविधा असलेल्या गावांनाही प्राधान्य दिले जाणार आहे.
'मिशन महाग्राम’चा भर केवळ गावातील पायाभूत सुविधांपुरता मर्यादित राहणार नसून, गावकऱ्यांना शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यावरही लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्यामुळे विकासकामांसोबत स्थानिक पातळीवर रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.