Panchayat Samitee Election News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राज्यात फारसे यश मिळाले नाही. मुंबई महापालिकेत दोन भाऊ एकत्र आले, ते सत्ता राखतील असे वाटत असताना मनसेचे उद्धव ठाकरे यांना मजबूत साथ मिळाली नाही, असे बोलले गेले. परंतु याच मनसेने मराठवाड्यात पंचायत समितीमध्ये आपला सभापती बसवत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडीसाठी भाजपा-मनसेमध्ये युती झाली आणि हा चमत्कार घडला. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आपला 20 वा वर्धापनदिन साजरा करत असताना हे घडल्यामुळे पक्षासाठी आणि राज ठाकरे यांच्यासाठी हे सरप्राईज गिफ्ट ठरले आहे. मनसे-भाजप युतीच्या माध्यमातून पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यात मनसेला यश मिळाले आहे. सभापतीपद मनसेच्या वाट्याला आले असून येथे थेट सत्ता स्थापन केली आहे.
लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच पंचायत समितीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. रेणापूर पंचायत समितीच्या एकूण आठ जागांपैकी काँग्रेसने तीन, भाजपाने (BJP) तीन तर मनसेने दोन जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे, सत्तास्थापनेत मनसेची भूमिका निर्णायक ठरणार होती. किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या मनसेने थेट सभापती पदच पटकावले.
पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यानुसार, सोमवारी समिती सभापती पदासाठीची निवड प्रक्रिया पार पडली. मनसेच्या मोनिका सूर्यवंशी यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर भाजपचे शरद दरेकर हे उपसभापती झाले. लातूर ग्रामीणचे भाजप आमदार रमेश कराड यांनी या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली होती.
रमेश कराड यांनी टाकलेला डाव अखेर यशस्वी ठरला
रेणापूरमध्ये मनसेच्या विजयाचे श्रेय ज्यांना जाते ते मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे आणि आमदार रमेशअप्पा कराड यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून मनसेचा मराठवाड्यात पहिला सभापती खुर्चीवर बसला. मनसे-भाजप युतीमुळे रेणापूर पंचायत समितीवर या दोन पक्षाची सत्ता आली आहे. लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख, लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांना शह देण्यासाठी भाजप आमदार रमेश कराड यांनी टाकलेला डाव अखेर यशस्वी ठरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.