MPSC Protest | Vivek Bhimnawar | Pune Student Protest Sarkarnama
महाराष्ट्र

MPSC Protest : MPSC आंदोलकांचा मोठा विजय! विवेक भीमनवार यांची मध्यरात्री मोठी घोषणा

MPSC Chairman Vivek Bhimnawar On Leave : MPSC आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी रविवारी (११ ऑक्टोबर) रात्री राज्य सरकारच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आंदोलनस्थळी पोहोचले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे सांगितले.

Jagdish Patil

Pune News, 12 Oct : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारासंदर्भात विविध मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालं आहे. गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनातील प्रमुख मागणी असलेले आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहता सक्तीच्या रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत माहिती दिली. भीमनवार यांच्या या घोषणेनंतर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत आंदोलनस्थळी मोठा जल्लोष केला. या जल्लोषाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी रविवारी (११ ऑक्टोबर) रात्री राज्य सरकारच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आंदोलनस्थळी पोहोचले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे सांगितले. तसेच, यापुढे तुकाराम मुंढे हे एमपीएससीच्या चौकशी समितीचे सचिव म्हणून काम पाहतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली.

शिवेंद्रराजे भोसले विद्यार्थ्यांशी चर्चा करत असतानाच विवेक भीमनवार यांनी 'एक्स'वर आपला निर्णय जाहीर केला. चौकशी पूर्ण होईपर्यंत पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येताच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

विवेक भीमनवार यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?

विवेक भीमनवार यांनी आपल्या पोस्टमध्ये एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचा संदर्भ दिला. राज्य सरकारने या प्रकरणात न्यायालयीन चौकशी जाहीर केली असल्याचे सांगत त्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

"एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल," असे भीमनवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

गेल्या ११ दिवसांपासून विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत होते. त्यामध्ये आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी प्रमुख होती. आता भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी या आंदोलनातील महत्त्वाचा टप्पा गाठल्याची भावना व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT