

Mumbai Political News : देशाची राजधानी दिल्लीसह विविध राज्यांत केंद्र सरकार आणि SIR प्रक्रियेविरोधात आंदोलन सुरू असताना मुंबईतही सरकारविरोधी आंदोलनाला जोर चढला. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात रविवारी झालेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे सहभागी झाले. सीजेपी, शिवसैनिक, मनसैनिक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप आले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचा दावा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीका करत, ‘हीच दादागिरी, हीच हुकूमशाही मोडून काढणार,’ असा इशारा दिला.
मुंबईत आंदोलनाला जोर; ठाकरे बंधूंचा सहभाग
शिवाजी पार्क परिसरात आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे आंदोलनात सहभागी झाल्यानंतर परिस्थिती अधिक तापली. सीजेपीचे कार्यकर्ते, शिवसैनिक, मनसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. ज्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. तसेच आंदोलकांना ताब्यात घेतले.
या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलकांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आल्याचा आरोप केला. तुषार गांधी यांना सांताक्रूझ येथून बोरिवलीला नेण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘नागरिकांवर अशी दडपशाही का?’
आंदोलनाला राजकीय स्वरूप देणे योग्य नसल्याचे सांगत आदित्य ठाकरे म्हणाले की, या आंदोलनात विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे हे केवळ राजकीय आंदोलन नसून नागरिकांच्या नाराजीचे प्रतिबिंब आहे, असा दावा त्यांनी केला. आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी सवाल उपस्थित केला. नागरिकांवर अशा प्रकारची दडपशाही का केली जात आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
‘दिल्लीमध्ये जे घडले, ते मुंबईत होऊ देणार नाही’
दिल्लीतील आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती मुंबईत होऊ देणार नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुंबईसह महाराष्ट्रातही आंदोलन सुरूच राहील, असे सांगत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यास आणखी तीव्र आंदोलने होतील, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही दखल घेतली जाईल, असे ते म्हणाले. महिलांना त्रास दिल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यावरूनही आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. कार्यकर्ते आणि आमदारांना ताब्यात घेण्यात आल्याचा तसेच शिवसेना भवन परिसरात पोलिसांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांना दिल्लीतील घटनांच्या पार्श्वभूमीवर काही आदेश देण्यात आले होते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘काही महिन्यांत केंद्रात सत्ताबदल होईल’
केंद्र सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी आगामी काळात सत्ताबदल होईल, काही महिन्यांत केंद्र सरकार बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आंदोलनाला राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोप करत त्यांनी भाजप आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील नागरिकांच्या नाराजीचा मुद्दा मांडला. हे आंदोलन देशप्रेमी नागरिकांच्या भावनांमधून उभे राहिले असल्याचेही ते म्हणाले.
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही भाष्य
आदित्य ठाकरे यांनी MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचाही उल्लेख केला. आंदोलनाचा अकरावा दिवस उलटूनही MPSC अध्यक्ष भीमनवार यांच्याबाबत निर्णय झालेला नसल्याचे सांगत त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. MPSCची तयारी करणारे अनेक विद्यार्थी दुष्काळग्रस्त भागांतून येतात. त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या असतानाही त्यांना आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करावे लागत आहे. पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने न पाहता उलट पोलिसांचा दबाव वाढवल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.