MPSC Protest : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! तुकाराम मुंढे चौकशी समितीचे सचिव; शिवेंद्रराजेंची भरतीबाबत खूशखबर

IAS Tukaram Mundhe to Serve as MPSC Secretary : पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा 11 दिवस आहे. दरम्यान एफडीएचे आयुक्त आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे नवी जबाबदारी देण्यात आल्याची घोषणा शिवेंद्रराजे यांनी केली आहे.
Tukaram Mundhe appointed MPSC secretary
Tukaram Mundhe appointed MPSC secretarySarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune MPSC Students Protest : पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, रविवारी आंदोलनाचा अकरावा दिवस होता. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह विविध मुद्द्यांवर विद्यार्थी ठाम आहेत.

दरम्यान, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी रात्री उशिरा आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत तयार केलेला अंतिम मसुदा सादर केला. तसेच, एमपीएससीसंदर्भातील चौकशी समितीच्या सचिवपदाची जबाबदारी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देण्यात आल्याची घोषणा केली.

MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन

एमपीएससीसंदर्भातील विविध मागण्यांसाठी पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. पेपरफुटीच्या प्रकरणासह आयोगाच्या कामकाजाबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.

Tukaram Mundhe appointed MPSC secretary
Tukaram Mundhe : ‘ओ मुंढे काका, आमचा वडापाव सुरू करा ना!’ विद्यार्थ्याचा Video व्हायरल; आयुक्तांनी काय सांगितलं?

दरम्यान, रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून, त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तुकाराम मुंढे यांच्याकडे जबाबदारी

पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी कडक आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची महत्त्वाची भूमिका असावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. या मागणीला विरोधी पक्षांच्या काही आमदारांनीही पाठिंबा दिला होता.

शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीच्या सचिवपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देण्यात आली आहे. ही समिती निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारकडून अंतिम मसुदा सादर

विद्यार्थ्यांनी मांडलेल्या २० हून अधिक मागण्यांबाबत राज्य सरकारने अंतिम मसुदा तयार केला असल्याचे शिवेंद्रराजे यांनी सांगितले. हा मसुदा त्यांना दुपारी मिळाला होता; मात्र त्यात काही दुरुस्त्या आवश्यक असल्याने अंतिम स्वरूप देण्यास वेळ लागला, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव यांच्या स्वाक्षऱ्यांनंतर हा मसुदा विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आल्याचेही शिवेंद्रराजे म्हणाले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, त्यावर कार्यवाही करण्याची तयारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकारने मागण्यांबाबत घेतलेल्या भूमिकेची माहिती देत शिवेंद्रराजे यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, सरकारच्या आश्वासनांनंतर विद्यार्थी आंदोलन मागे घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tukaram Mundhe appointed MPSC secretary
Tukaram Mundhe : IAS तुकाराम मुंढेंचा थेट अमेरिकेत 'डंका'! The New York Times च्या पहिल्या पानावर जागा

सार्वजनिक बांधकाम विभागात १,६०० पदे भरणार

यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील भरतीबाबतही महत्त्वाची माहिती दिली. आपल्या विभागात १,६०० पदे भरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी ही दिलासादायक बाब असल्याचे नमूद करत त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन पुन्हा केले. दरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागणीवर अद्याप तोडगा निघालेला नसून सरकार अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेत का हे बघावं लागणार आहे. तर विद्यार्थ्यांच्या इतर सर्व मागण्या आता पूर्ण झाल्या असून ते शिवेंद्रराजे भोसले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सरकारच्या आश्वासनांनंतर कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com