Mumbai News: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपनं बुधवारी(ता.4 मार्च) चार उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर काही तासांतच महाविकास आघाडीच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. मविआचा राज्यसभा निवडणुकीसाठीचा उमेदवार अखेर ठरला आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषदेतून शरद पवारांच्या उमेदवारी महाविकास आघाडीतून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी (ता.4) अंतिम मुदत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग धरला होता. त्यातही मविआच्या गोटात राज्यसभेच्या उमेदवारीरुन एकमत होत नसल्याचं समोर येत होतं. पण सातव्या जागेसाठी महायुती प्रयत्नशील असल्याची कुणकुण लागताच महाविकास आघाडीतल्या हालचाली अखेरच्या टप्प्यात वेगवान झाल्या. अखेर महाविकास आघाडीकडून कुरघोडीचं राजकारण टाळण्यासाठी मुत्सद्दी,अनुभवी शरद पवारांच्या रुपानं एक तगडा उमेदवार मैदानात उतरवण्यात आला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावाला अखेर काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पत्रकार परिषद सुरू असतानाच संजय राऊतांनी सिल्व्हर ओकवर जाऊन पवारांची भेट घेतल्याचं दिसून आलं.
यापू्र्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन महाविकास आघाडी एक राहिल, असं स्पष्ट करत शरद पवारांच्या नावाला पाठिंबा असल्याचे संकेत दिले होते. राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच संजय राऊतांनी शरद पवारांच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. पण मध्यंतरीच्या काळात आदित्य ठाकरे आणि काँग्रेसनंही उमेदवार देण्याची भाषा केल्यानं महाविकास आघाडीसमोर नवा पेच निर्माण झाला होता.
महाविकास आघाडीकडून राज्यसभेच्या एका जागेसाठी अखेरच्या टप्प्यात प्रचंड घडामोडी घडताना पाहायला मिळालं. त्यात अखेर शरद पवारांच्या नावावर महाविकास आघाडीमध्ये एकमत झालं. पण शरद पवारांची राज्यसभेची उमेदवारी फिक्स करण्यापाठीमागं ही पाच प्रमुख कारणं अतिशय महत्त्वाची ठरल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी(ता.3) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. तसेच पाटील अन् सुळेंनी दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत शरद पवारांच्या उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग केल्याचं दिसून आलं होतं.
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुढे आला होता. या मुद्द्यांवरुन महाविकास आघाडीतही प्रचंड अस्वस्थता पसरली होती. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं अन् शरद पवारांनी जर एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर ही शंका उपस्थित करत काँग्रेसनं त्यांच्या उमेदवारीबाबत नकारात्मक सूर आळवला होता. पण जयंत पाटलांनी माध्यमांसमोर अगदी स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विलिनीकरणाच्या मुद्द्यावरची भूमिका स्पष्ट केल्यानंतर वेगानं सूत्रे फिरली.
जयंत पाटील यांनी आता दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणार नाही. ज्यांच्यासोबत ही चर्चा सुरू होती, ते अजित पवार आता हयात नाहीत. त्यामुळे हा विषय आता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आणि काँग्रेसच्या मनातला संदेह दूर झाला अन् दिल्लीतील हायकमांडनं शरद पवारांच्या उमेदवारीसाठी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना पाठिंबा देण्याबाबतचे आदेश दिले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही राज्यसभा निवडणुकीसाठी जर दिल्लीतील काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या नावाला पाठिंबा देणार असतील तर त्यांचाही शरद पवारांच्या नावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. अखेर दिल्लीतून हायकमांडनं शरद पवारांच्या उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल देताच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंही एक पाऊल मागे घेत आपला हट्ट सोडला.
माजी मंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा दावा धुडकावून लावतानाच संख्याबळ पाहता राज्यसभेची जागा आमचीच असल्याचं वारंवार म्हटलं आहे. शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी आग्रही असलेल्या संजय राऊतांना आदित्य ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेमुळे यू टर्न घ्यावा लागला होता. कारण आदित्य ठाकरे हे प्रियंका चतुर्वेदी यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते.
पण याचदरम्यान, मोदी-शाहांचं सध्याचं राजकारण पाहता शरद पवारांचं दिल्लीत असणं किती महत्त्वाचं आहे, हे खासदार व महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर बारीक नजर ठेवून असलेल्या संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या कानावर घातलं. यानंतरच आदित्य ठाकरेंनीही आपली भूमिका बदलल्याचं समोर येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.