Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांची निवडणूक घोषित झाली आहे. यासाठी 23 ऑक्टोबरला मतदान होत आहे. यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ तर पुणे व अमरावती शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरु आहे.
पण जागावाटपांचा निर्णय होण्यापूर्वीच काँग्रेसने 3 उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी दिसत आहे. आघाडीतील मित्रपक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीत जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत होती. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावरून राष्ट्र्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला आहे. त्यामुळे या जागावाटपावर उद्या पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड हयात हॉटेलमधील बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खासदार संजय राऊत उपस्थित होते. मात्र, महाविकास आघाडीच्या बैठकीत तोडगा निघाला नाही अशी माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीची पुन्हा उद्या (रविवारी) चर्चेची फेरी पार पडणार आहे.
काँग्रेसकडून अमरावती शिक्षक, नागपूर पदवीधर, पुणे शिक्षक मतदार संघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही अमरावती शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केला आहे. मराठवाडा पदवीधर जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दावा केला जात आहे. रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा बैठक घेऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक तर पुणे शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. पुणे मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघामधून अपेक्षेप्रमाणे आदिती पोहोरे यांना उमेदवारी जाहीर झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.