Lanke Vs Vikhe Sarkarnama
महाराष्ट्र

Lanke Vs Vikhe: दुष्काळात 'तेरावा महिना'; विखे-लंकेंमध्ये रंगला श्रेयवाद

Nagar Politics : नगर जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर होण्यावरूनदेखील राजकीय श्रेयवाद रंगण्याची चिन्हे आहेत.

Pradeep Pendhare

Nagar Political News : नगर जिल्ह्यातील 96 मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील काही मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर होण्यावरून आता श्रेयवाद रंगला आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी काल मंत्रालयातील वॉर रूममध्ये समितीच्या बैठकीत नगर जिल्ह्यातील 96 मंडलांमध्ये दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली. याच दिवशी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी आपल्याच पाठपुराव्यामुळे दुष्काळ जाहीर झाल्याचे म्हटले. नगर जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर होण्यावरूनदेखील राजकीय श्रेयवाद रंगण्याची चिन्हे आहेत.

नगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा 50 टक्के कमी पाऊस पडला आहे. दुष्काळाची स्थिती आहे. नगर दक्षिणेमध्ये तीव्र पाणीटंचाई नोव्हेंबरपासूनच सुरू झाली आहे. काही भागात टॅंकर सुरू झाले आहे. पाथर्डी आणि पारनेर तालुक्यांतील काही भागांमध्ये टॅंकरची मागणी होऊ लागली आहे.

राज्य सरकारने राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. यात नगर जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश नव्हता. यातच नगर जिल्ह्यातील काही भागाक दुष्काळसदृश परिस्थिती होती. आमदार नीलेश लंके यांनी नगर जिल्ह्यातील एकाही गावाचा दुष्काळी यादीत समावेश नाही, याबाबत आवाज उठवण्यात सुरुवात केली.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले. नगर जिल्ह्यातील दुष्काळावर गांभीर्याने विचार न केल्यास न्यायालयात जाऊ, असा इशारा आमदार लंके यांनी दिला होता.

मंत्रालयातील वॉर रूममध्ये मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीपूर्वी आमदार लंके यांनी मदत व पुरर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. मंत्री पाटील यांनी काही मंडलांत दुष्काळसदृश यादीत समावेश करण्यात येईल, असे आश्वासन आमदार लंके यांना दिले.

मंत्रिमंडळाच्या समितीच्या बैठकीत महसूल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगर जिल्ह्यातील 96 मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले.आपल्याच पाठपुराव्यामुळे हा निर्णय समितीच्या बैठकीत झाल्याचा दावा आमदार लंके यांनी केला आहे. परंतु उर्वरित मंडलासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार लंके यांनी म्हटले.

दरम्यान, पाथर्डी-शेवगावच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनीदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दुष्काळाकडे लक्ष वेधले होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील निवेदन देत पाणी टॅंकरची मागणी सुरू केली होती.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT