Nagpur News : एकमेकांना टीकेचे बाण सोडण्याची एकही संधी न दवडणाऱ्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन बड्या नेत्यांची आज अनेक दिवसांनी भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, फडणवीसांना भेटल्यानंतर ठाकरेंनी लगेचच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचीही भेट घेतल्याने तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
मागील पाच वर्षांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेकांवर टोकाची टीका करत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही संपूर्ण महाराष्ट्राने हे पाहिले. निवडणुकीच्या निकालानंतर दोघांमधील शाब्दिक चकमकीची धार कायम राहिली. यापार्श्वभूमीवर ठाकरेंनी मंगळवारी फडणवीसांची भेट घेतली.
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असून त्यासाठी ठाकरेही नागपुरात दाखल झाले आहेत. विधान भवनात दाखल झाल्यानंतर त्यांनी पहिली भेट फडणवीसांची घेतली. मुख्यमंत्री कार्यालयात हे दोन नेते भेटले. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब, भास्कर जाधवही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास सात मिनिटांची खलबतं झाली.
फडणवीसांच्या भेटीनंतर ठाकरेंचा मोर्चा नार्वेकरांच्या दालनाकडे वळाला. ठाकरेंनी नार्वेकरांचीही भेट घेतल्याने विरोधी पक्षनेतेपदासाठी या भेटीगाठी असल्याच्या चर्चेला जोर आला. अद्याप विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडीत शिवसेनेकडे सर्वाधिक 20 आमदार आहेत. त्यामुळे या पदासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यासाठी ठाकरेंनी नार्वेकरांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान, ठाकरेंनी फडणवीसांची सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचे ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. मात्र, या भेटीगाठींमुळे कडाक्याच्या थंडीतही नागपुरातील राजकीय वातावरण मात्र तापल्याचे दिसून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.