Nitesh Karale Master Sarkarnama
महाराष्ट्र

Nagpur Graduates Election : 'गुलाल आपला'च म्हणाणाऱ्या कराळे मास्तरांना पराभव मान्य; ‘घाम फोडला’ म्हणत पुढचा प्लॅनही सांगितला

Nitesh Karale On Nagpur Graduates Election 2026 : नागपूर पदवीधरमध्ये वंजार-कोहळेंमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत असून गुलाल आपलाच म्हणणारे महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार नीतेश कराळे यांच्या पदरात मात्र निशारा आली आहे.

Aslam Shanedivan

Nagpur MLC Results News : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळत आहे. सुधाकर कोहळे आणि ॲड. अभिजित वंजारी यांच्यात अटीतटीची लढत सुरू असून, या निकालाबाबत कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांना निर्णायक महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार नीतेश कराळे यांनीही या निवडणुकीत लक्षवेधी मते मिळवली आहेत.

अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या नीतेश कराळे यांनी दुसऱ्या फेरीअखेर जवळपास २५ हजार मते मिळवली आहेत. मात्र, विजयी होण्यासाठी आवश्यक असलेला कोटा त्यांना गाठता आलेला नाही. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. यानंतर कराळे यांनी प्रतिक्रिया देताना, ज्यांनी आपल्याला मतदान केले आणि विश्वास दाखवला, त्या सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच, आपण महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना चांगलाच घाम फोडल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कराळे मास्तरांना २४ हजारांहून अधिक मते

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत दुसऱ्या फेरीअखेर नीतेश कराळे यांना २४ हजार २४९ मते मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मतांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.

निवडणुकीतील निर्धारित कोटा पूर्ण करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांना अनुक्रमे १४ हजार ५१४ आणि १८ हजार ८०८ मतांची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बाद होणाऱ्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीक्रमाची मते कोणाच्या पारड्यात पडतात, यावर निकालाचे गणित अवलंबून असेल.

या निवडणुकीत आतापर्यंत १५ हजार ३२ मते अवैध ठरली आहेत. विजयी होण्यासाठी ७५ हजार ४३८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात कोणता उमेदवार सर्वप्रथम निर्धारित कोटा पूर्ण करतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

‘दोन्ही राष्ट्रीय पक्षांना घाम फोडला’

नीतेश कराळे यांनी आपला पराभव मान्य करत मतदारांचे आभार मानले. अनेकांची इच्छा होती की ‘कराळे मास्तर’ निवडून यावेत. त्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, आपल्या पाठीशी कोणतीही संघटना नसतानाही आपण दोन्ही राष्ट्रीय पक्षांना घाम फोडल्याचे त्यांनी म्हटले. “या निवडणुकीत मला जवळपास २५ हजार मते मिळाली.

ज्यांनी माझ्यावर प्रेम दाखवले, मला मतदान केले आणि माझ्यावर विश्वास ठेवला, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो,” असे कराळे यांनी सांगितले. आपल्याला मिळालेली मते ही कोणत्याही पैशाच्या व्यवहाराशिवाय मिळालेली असल्याचा दावाही त्यांनी केला. ही २५ हजार मते निर्णायक ठरू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दुसऱ्या पसंतीची मते वंजारींना मिळण्याचा कराळेंचा दावा

सुधाकर कोहळे आणि अभिजित वंजारी यांच्यात सध्या चुरस सुरू आहे. या निवडणुकीत आपल्याला मिळालेली मते निर्णायक ठरणार असून, दुसऱ्या पसंतीक्रमाची मते कोणाला मिळतात, हेच निकाल ठरवेल, असे कराळे यांनी म्हटले आहे. कोहळे यांना मिळालेली सुमारे चार हजार मतांची आघाडी वंजारी यांना आधी कमी करावी लागेल आणि त्यानंतर आघाडी मिळवावी लागेल. मात्र, हे सहज शक्य असल्याचा दावा कराळे यांनी केला. आपल्याला मिळालेल्या मतांमधून दुसऱ्या पसंतीक्रमाची अधिक मते अभिजित वंजारी यांना मिळतील, असेही त्यांनी सांगितले.

‘प्रत्येक लढाई जिंकण्यासाठीच नसते’

“प्रत्येक लढाई जिंकण्यासाठीच लढली जात नाही, तर आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठीही लढली जाते,” असे कराळे यांनी म्हटले. या निवडणुकीत आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अपक्ष म्हणून अर्ज दाखल करावा लागला, असे त्यांनी सांगितले. मुलांनी आपल्यासाठी अर्ज भरला, प्रेम दाखवले आणि आपण त्यांच्या पाठीशी असल्याचे सिद्ध केले. या निवडणुकीतून पदवीधर मतदारसंघाची लढत नेमकी काय असते, हे दाखवून दिल्याचेही कराळे यांनी म्हटले.

जिल्हा परिषद, पंचायत समितीबाबत लवकरच निर्णय

भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत बोलताना नीतेश कराळे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत काही दिवसांत निर्णय घेणार असल्याचे सांगितले. तसेच, विदर्भात संघटना उभी करायची की संपूर्ण महाराष्ट्रात संघटनात्मक काम करायचे, याबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT