Nagpur Zilla Parishad Pension e-Kuber Pension Sarkarnama
महाराष्ट्र

Nagpur ZP: नागपूर जिल्हा परिषद ठरली राज्यात पहिली! पेन्शन वितरणातील मध्यस्थी संपली; ‘ई-कुबेर’द्वारे पेन्शन थेट खात्यात

Nagpur Zilla Parishad Pension e-Kuber Pension: नव्या व्यवस्थेमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरील मध्यस्थीचे टप्पे कमी झाले असून, पेन्शन वितरण अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ होण्यास मदत झाली आहे.

Mangesh Mahale

Nagpur News: निवृत्तीनंतर हक्काचे निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी कार्यालयीन प्रक्रियेच्या अनेक फेऱ्या मारण्याची गरज आता कमी होणार आहे. नागपूर जिल्हा परिषदेने पेन्शन वितरणाच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करत ‘निवृत्त वेतन वाहिनी’ प्रणालीची अंमलबजावणी केली आहे.

‘ई-कुबेर’ प्रणालीच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांच्या बँक खात्यात थेट पेन्शन जमा करणारी नागपूर जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.या नव्या व्यवस्थेमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरील मध्यस्थीचे टप्पे कमी झाले असून, पेन्शन वितरण अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ होण्यास मदत झाली आहे.

ऑगस्टचे १० कोटींहून अधिक रुपये थेट खात्यात

नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या १३ पंचायत समित्यांमधील शिक्षक संवर्ग वगळता ४ हजार ४६ निवृत्त अधिकारी-कर्मचारी आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना या प्रणालीचा लाभ मिळाला आहे. ऑगस्ट २०२६ महिन्याचे निवृत्तीवेतन म्हणून त्यांच्या खात्यांमध्ये एकूण १० कोटी ४३ लाख ७४ हजार ८५३ रुपये थेट जमा करण्यात आले.

पेन्शनची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचल्याने वितरणाच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आली आहे. तसेच पेन्शन जमा होण्यासाठी लागणारा वेळ कमी होण्याची शक्यता आहे.

आधी पेन्शन पोहोचण्यासाठी अनेक टप्पे

यापूर्वी निवृत्तीवेतन वितरणाची प्रक्रिया तुलनेने लांब होती. कोषागार कार्यालयाकडून पेन्शनची रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग केली जात असे. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून संबंधित पंचायत समितीकडे आणि पुढे पंचायत समितीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जात होती.

या प्रक्रियेत अनेक प्रशासकीय टप्पे असल्याने काही वेळा पेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचण्यास विलंब होत असे. विशेषतः निवृत्तीनंतर पेन्शन हे नियमित उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेल्या अनेकांसाठी हा विलंब अडचणीचा ठरत होता.

‘ई-कुबेर’मुळे मध्यस्थीचे टप्पे कमी

नव्या व्यवस्थेत कोषागार कार्यालयाकडून ‘ई-कुबेर’ प्रणालीच्या माध्यमातून पेन्शनची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत प्रशासकीय हस्तक्षेप आणि मध्यस्थीचे टप्पे कमी झाले आहेत. यामुळे पेन्शन वितरणाची प्रक्रिया अधिक वेगवान होण्यासोबतच लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची थेट माहिती मिळू शकते.

ग्रामविकासच्या ‘निवृत्त वेतन वाहिनी’ची अंमलबजावणी

सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी कार्यालयीन प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत, या उद्देशाने राज्याच्या ग्रामविकास विभागाने ‘निवृत्त वेतन वाहिनी’ प्रणाली विकसित केली आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार नागपूर जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने या प्रणालीची अंमलबजावणी केली आहे. सध्या शिक्षक संवर्ग वगळून जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना या व्यवस्थेचा लाभ देण्यात आला आहे.

वित्त विभागाच्या समन्वयातून प्रक्रिया पूर्ण

‘ई-कुबेर’ प्रणाली प्रत्यक्षात आणण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी कुमुदिनी श्रीखंडे यांनी विशेष प्रयत्न केले. वित्त विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून पेन्शन वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी करताना निवृत्तीवेतनधारकांना प्रत्यक्ष आणि वेळेत लाभ मिळावा, याला प्राधान्य देण्यात आले.

कर्मचारी संघटनेचा पाठपुरावा

पेन्शन वितरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना-६१५ कडूनही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. आता निवृत्तांच्या खात्यात थेट पेन्शन जमा होण्याची व्यवस्था सुरू झाल्याने या निर्णयाचे संघटनेने स्वागत केले आहे. “मध्यस्थीची प्रक्रिया संपल्याने पेन्शन वितरण अधिक जलद झाले आहे," अशी प्रतिक्रिया नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT