Nanded MLC News : गत ४ वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्याने विधानपरिषदेच्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक देखील होऊ शकल्या नव्हत्या. यात २३ नोव्हेंबर २०२४ पासून नांदेड मतदारसंघाची जागा रिक्त आहे. आता २० जिल्हा परिषद वगळता राज्यातील जवळपास सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्याने विधानपरिषद निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना या मतदारसंघावर काँग्रेसचा दबदबा होता. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये आले, खासदार झाले. त्यानंतर जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये भाजप मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपचा आमदार होणार आहे.आता भाजपकडून अशोक चव्हाण यांच्यासोबत आलेल्या नव्या उमेदवाराला संधी दिली जाणार का? की नांदेडमध्ये भाजपच्या पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या निष्ठावंताला संधी दिली जाणार? याची उत्सुकता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत संबंधित मतदारसंघातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती मतदान करतात. त्यामुळे इथले संख्याबळ निर्णायक भूमिका बजावते. अद्याप २० जिल्हा परिषदांची निवडणूक झाली नसली तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या ७५ टक्के वा त्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे नियमानुसार तिथे निवडणूक होण्यात कोणतीही अडचण नाही.
डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या जिल्ह्यातील १२ नगरपालिका व ४ नगरपंचायत निवडणूक आणि जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणूक निकालामध्ये भाजपने मोठी बाजी मारली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य वगळता सध्या एकूण ४२० सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपचे १२५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ८०, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे २३ असे एकूण २२८ सदस्य महायुतीचे आहेत तर काँग्रेस ८४, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे १६, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ६ असे एकूण १०६ सदस्य महविकास आघाडीचे आहेत. त्याशिवाय अपक्ष १८, मराठवाडा जनहित पार्टी ३३, एमआयएम ४, वंचित १ सदस्य आहे.
नांदेड जिल्ह्यात एकूण १२ नगरपालिका व ४ नगरपंचायती आहेत. नांदेड जिल्हयात मुदखेड, देगलूर, मुखेड, कंधार, उमरी, धर्माबाद, बिलोली, हदगाव, भोकर या नगरपरिषदा आहेत तर अर्धापूर, मुदखेड, हिमायतनगर, माहूर, लोहा, नायगाव, किनवट नगरपंचायतीचा समावेश आहे. या ठिकाणचा निकाल पाहता भाजपचे वर्चस्व आहे.
नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये एकूण ३२३ जागा आहेत. त्यामध्ये भाजपचे ७७, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ७५, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे १७ असे एकूण १६९ सदस्य महायुतीचे आहेत. तर काँग्रेस ६९, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे १५, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ६ असे एकूण ९० सदस्य महविकास आघाडीचे आहेत.
त्याशिवाय अपक्ष १८, मराठवाडा जनहित पार्टी ३३, एमआयएम ४, वंचित १ सदस्य निवडून आला आहे. सोबतच जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षाला मतदानाचा अधिकार आहे. त्यानुसार भाजपचे ३, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ३, स्थानिक आघाडी २, एकनाथ शिंदे शिवसेना २, काँग्रेस ५ तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एका ठिकाणी नगराध्यक्ष झाला आहे.
नांदेड पालिकेवर भाजपचे वर्चस्व
नांदेड महापालिकेत एकूण ८१ नगरसेवक आहेत. त्यामध्ये भाजपचे ४५, एमआयएमचे १४, काँग्रेसचे १०, वंचित बहुजन आघाडीचे ५, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ४, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे २, अपक्ष १ असे संख्याबळ आहे.
नांदेड जिल्ह्यातील पक्षीय बलाबाल पाहता महायुतीचे प्राबल्य ठळकपणे दिसून येते. त्या तुलनेत महाविकास आघाडी कमजोर दिसत आहे. महायुतीमध्ये भाजपाची संख्या मोठी असल्याने या जागेवर भाजपचा उमेदवार असणार हे निश्चित आहे. त्यामुळे ऐनवेळी काय घडामोडी घडणार यावर गणित अवलंबून असणार आहे.
या मतदार संघाचे दोनवेळा प्रतिनिधित्त्व अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक अमरनाथ राजूरकर यांनी केले आहे. पहिल्यांदा २०१०-२०१६ या कालावधीत अमरनाथ राजूरकर यांच्या माध्यमातून याठिकाणी काँग्रेसचे एकहाती वर्चस्व होते तर २०१६-२०२२ मध्ये अमरनाथ राजूरकर पुन्हा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
आता अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले अमरनाथ राजूरकर हे देखील भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर होत असलेल्या स्थानिकांच्या निवडणुकीत अमरनाथ राजूरकर यांना पुन्हा संधी दिली जाणार का? याकडे लक्ष लागले आहे. त्यातच भाजपकडून या जागी एकाद्या निष्ठावंत नेत्याला संधी दिली जाणार का? याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.