Yashomati Thakur and Navneet Rana sarkarnama
महाराष्ट्र

Navneet Rana: गेल्यावेळी नवनीत राणा माझ्यामुळे खासदार, यावेळी त्यांना मीच पाडलं; काँग्रेस महिला नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Sachin Waghmare

Political News : लोकसभा निवडणुका होऊन दीड महिना झाले तरी जय-पराजयाचे कवित्व अजून संपायला तयार नाही. सत्ताधारी व विरोधकाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे एकमेकांची उणे-धुणे काढली जात आहेत. त्यातच गेल्यावेळी नवनीत राणा माझ्यामुळे खासदार झाल्या होत्या. यावेळी त्यांना मीच पाडले, असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेसच्या महिला नेत्यांनी केला आहे.

नवनीत राणा या गेल्यावेळी माझ्या मतांवर खासदार झाल्या होत्या, यावेळी मते काढून घेतल्यावर त्या पडल्या, अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी राणांना टोला लगावला. गेल्यावेळी आम्ही त्यांना मतं दिली, ती यावेळी काढून घेत आमची ताकद दाखवली असंही त्या म्हणाल्या. पंढरपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बॊलताना त्यांनी हा दावा केला आहे. (Navneet Rana News)

गेल्या वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा (Navneet Rana) यांना निवडणुकीत मदत केली होती. त्यामुळे त्या आमच्या मतावर अमरावती मतदार संघातून खासदार झाल्या होत्या. पण यावेळी आमची मते काढून घेतल्यावर त्यांना पराभूत व्हावे लागले, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून गेल्या होत्या. पण निवडणूक झाल्यानंतर त्यांनी भाजपला साथ दिली. त्याचा वचपा आता महाविकास आघाडीने काढला आणि राणा यांना पराभव स्वीकारावा लागला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी पराभव केला. आगामी काळात होत असलेली विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून सत्ताही येईल, असा दावा आमदार यशोमती ठाकूर यांनी केला.

काही दिवसापूर्वी नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकुर यांच्यावर टीका केली होती. मी जे काही करते ते ओरिजनल आहे. आता ब्रँडला कॉपी करणारे खूप सारे कॉपी घेऊन जातात, पण ब्रँड हा ब्रँड असतो असे म्हणत नवनीत राणांनी ठाकूर यांना टोला लगावला होता.

निवडणुकीपूर्वी योजना

लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीपासूनच अडचणी येत आहेत. अर्थ विभागानेही त्याला विरोध केल्याचे समजते आहे. महायुतीकडून निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेली आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता ही योजना निवडणुकीनंतर गुंडाळली जाईल, हा फक्त निवडणुकीपर्यंतचा जुमला राहील, असा टोला ठाकूर यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT