Sharad pawar NCP Sarkarnama
महाराष्ट्र

NCP Sharad Pawar: तुतारी की पिपाणी..? लोकसभेला दगाफटका; विधानसभेलाही उडणार गोंधळ, पवारांची 'ती' मागणी आयोगाकडून अमान्य

Deepak Kulkarni

NCP Sharadchandra Pawar News: निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय पक्षांच्या तयारीला आणखी वेग येणार आहे.

पण एकीकडे पक्ष फुटल्यानंतरही शरद पवारांच्या (Sharad Pawar) झंझावातामुळे लोकसभेला 10 पैकी 8 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिंकल्या होत्या.या त्यांच्या दमदार कामगिरीमुळे महायुतीला जोरदार धक्का बसला होता. या यशानंतर विधानसभा निवडणुकीवर पू्र्ण फोकस करत पवारांनी महाराष्ट्रात सत्तांतर घडवणारच असा निर्धार करत महायुतीला धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे. मात्र,लोकसभा निवडणुकीप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत 'पिपाणी' चिन्हामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यामुळे शरद पवार पक्षाकडून पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.

मात्र,निवडणूक आयुक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या त्या मागणीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रम्पेट हे वेगळं दिसतं, त्यामुळं ते हटवता येणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं असल्याचं आयोगाने म्हटलं आहे.

शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या 3 मागण्या...

केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाकडून आम्हांला तीन विनंत्या करण्यात आल्या होत्या. त्यात पहिली विनंती राज्य पक्ष म्हणून मान्यता, त्याचप्रमाणे आता त्यांना निधी स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. तर तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह,वोटिंग मशीनवर लहान दिसतं, ते मोठं करण्यात यावं त्याप्रमाणे त्यांना दिलेल्या पर्यायापैकी त्यांनी पहिला पर्याय मान्य केला आहे,आता ते चिन्ह मोठं दिसेल.

तर तिसरी त्यांची मागणी होती की, ट्रम्पेट हटवावं,पण तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रम्पेट हे वेगळं दिसत असल्यामुळे ते हटवता येणार नाही असंही आयुक्तांनी सांगितलं.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पिपाणीच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हाऐवजी 'पिपाणी'ला अनेक ठिकाणी मतदान करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून केला गेला होता. सातारा, दिंडोरी, रावेर, भिवंडी, शिरूर या मतदारसंघात पिपाणी चिन्ह मिळालेल्या अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मतं मिळाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या 10 जागा या ग्रामीण भागांमध्ये होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांना संभ्रम करण्यासाठी पिपाणी या निशाणीवर उमेदवार उभे केले गेले.

विधानसभा निवडणुकीसाठीदेखील विरोधकांकडून ही ट्रिक वापरली जाऊ शकते. त्यामुळे या ट्रिकमुळे लोकसभा निवडणुकीत मतं विभागली गेली. यामुळे ग्रामीण भागात तुतारी ही निशाणी मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसमोर आहे.

दिंडोरी मतदारसंघात भास्कर भगरे निवडणून आले असले तरी त्यांच्या विरूद्ध उभे असलेले ज्यांच्याकडे पिपाणी हे चिन्ह होते असे बाबू सदू भगरे यांना जवळपास एक लाख तीन हजार मते मिळाली. माढामध्ये सुद्धा घोटूकडे यांनी पिपाणी चिन्हावर 58 हजार मते मिळवली. तसेच बीडमध्ये अशोक थोरात यांनी 54 हजार मते मिळवली.

दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघामध्ये गोरख पाळेकर यांना 44 हजार मते मिळाली. सातारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना 35 हजार मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात यश गाडे यांना जवळपास 37 हजार मतदान पिपाणी निशाणीवर झाले.

बारामतीमध्ये सुद्धा पिपाणीच्या उमेदवाराला 14 हजार मतांचे मताधिक्य मिळाले. यावरून विधानसभा निवडणुकीत पिपाणी या चिन्हाचा फटका तुतारीला बसू शकतो. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन फटका बसण्या आधीच त्याच्यावर रणनिती आखली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT