Jitendra Awhad  Sarkarnama
महाराष्ट्र

Local Body Elections : 'विधानसभेतील पानिपतचा धसका'; पवारसाहेबांचा नेता म्हणतो, ''स्थानिक'च्या निवडणुकीला 'मविआ'त...'

NCP SharadChandra Pawar party Jitendra Awhad local body elections MVA : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे पानिपत झाले, यातून सावरून घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समोर जाऊ, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अक्षरशः पानिपत झाले. विरोधी पक्षनेता होईल, एवढे देखील संख्याबळ महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला मिळाले नाही. महायुतीच्या या जोराच्या राजकीय धक्क्यातून सारवण्यासाठी इंडिया आघाडीतील नेते थेट दिल्लीत बसून रणनीती ठरवत आहेत.

दरम्यान, राज्यात दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महाविकास आघाडी एकत्र समोरे जाणार का? यावर चर्चा आता सुरू झाल्या आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'स्थानिक'च्या निवडणुकांबाबत 'मविआ'वर मोठं भाष्य केले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, "स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते करत आहेत. तरी या निवडणुका महाविकास आघाडीच्याच माध्यमातून लढल्या पाहिजेत". विधानसभा निवडणुकीत अपयशाकडे पाहण्यापेक्षा लोकसभेच्या विजयाकडे पाहणं देखील महाविकास आघाडीच्या भविष्यासाठी चांगले आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

'महाविकास आघाडीच्याच (MVA) माध्यमातून स्थानिक पातळीवरील निवडणुका लढविल्या गेल्या पाहिजेत. महायुती निवडणुकांमध्ये कसे यश मिळाले, हा संशोधनाचा विषय असला, तरी सध्याच्या परिस्थितीत मविआतील सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणे योग्य ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आम्ही मान्य करीत नाही', असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी 'ईव्हीएम' मशीनवर बोलताना, "आमचा 'ईव्हीएम'वर विश्वास नाही. अचानक मतांचा टक्का इतका कसा वाढतो? या प्रश्नाचे उत्तर आम्हाला निवडणूक आयोगांकडून हवे आहे. लाडक्या बहिणींना देण्यासाठी ते पैसे कुठून आणणार? परंतु प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते, ती सतत फुकट दिली, तर श्रीलंकेसारखे आर्थिक अरिष्ट ओढवू शकते. ही परिस्थिती सुधारण्याकरिता कोणाला तरी जयप्रकाश नारायण व्हावे लागेल. अन्यथा, महाराष्ट्राला कोणीही वाचवू शकणार नाही".

विधानसभा आणि लोकसभेत जरी महाविकास आघाडी असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी स्थानिक पातळीवरील परिस्थिती वेगळी असते. त्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा रोष वरिष्ठ नेत्यांना आणि पक्षांना परवडणारा नसतो. त्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या पानिपतनंतर स्थानिक पातळीवर कार्यकर्ते, पदाधिकारी काय निर्णय घेतात, यावर 'मविआ'चे बरच काही भविष्य अवलंबून राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT