NEET Paper Leak News Update: देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेली NEET 2026 परीक्ष रद्द करण्यात आली आहे. तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणाऱ्या या घोटाळ्यात आता महाराष्ट्रातील नाशिकचे नाव समोर येत असल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात पेपरफुटीची पहिली कॉपी नाशिकमध्ये तयार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
3 मे रोजी झालेली NEET परीक्षा अखेर रद्द करण्यात आली असून लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. महाराष्ट्रातील दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर याचा थेट परिणाम झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभर रात्रंदिवस मेहनत घेतली, मात्र पेपरफुटीच्या रॅकेटमुळे त्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे.
राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (SOG) केलेल्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. परीक्षा होण्याच्या तब्बल 42 तास आधीच प्रश्नपत्रिका टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवर फिरत होती. विशेष म्हणजे हा पेपर “गेस पेपर” म्हणून विद्यार्थ्यांमध्ये पसरवण्यात आला होता. सीकरमधील हॉस्टेल आणि पीजीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधीच प्रश्नपत्रिका पोहोचली होती.
तपासात हरियाणामध्ये या पेपरचे 10 संच तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. नाशिकमधून पहिली कॉपी तयार करून बिहार, आंध्रप्रदेश आणि जम्मू-काश्मीरसह इतर राज्यांमध्ये हे पेपर पोहोचवण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
या प्रकरणी आतापर्यंत 13 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून आणखी मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेपरफुटीमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मचा अत्यंत नियोजनबद्ध वापर करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
देशभरात संतापाची लाट उसळल्यानंतर केंद्र सरकारने कठोर भूमिका घेत थेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार असून पेपरफुटीमागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. “आमच्या मुलांनी वर्षभर मेहनत घेतली, मग चुका करणाऱ्यांची शिक्षा विद्यार्थ्यांना का?” असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.