Nila Vikhe Patil latest news : स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नीला विखे पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र राज्यात मंत्री असलेले त्यांचे काका राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह अनेकांनी नीला यांच्याविषयी अभिमान वाटत असल्याचे सांगितले. पण आता नीला विखे पाटील यांनीच काका अन् चुलत भावाला राजकारणावरून आरसा दाखविला आहे.
नीला यांच्या स्वीडनमधील विजयानंतर सुजय विखेंनी केलेले एक विधान चर्चेत आले होते. आपल्याला खासदारकीपासून कोणीही दूर ठेवू शकत नाही. भारतात खासदार नाही झालो तर आपण स्वीडनमध्ये होतो. खासदारकी सोडायची नाही. ही बाळासाहेब विखे पाटलांची पुण्याई आहे, असे ते म्हणाले होते. त्याचा नीला यांनीही खरपूस समाचार घेतला आहे.
'पीटीआय'च्या वृत्तानुसार, स्वीडनमधून दिलेल्या मुलाखतीत नीला यांनी सुजय यांच्या या विधानावर बोलताना म्हटले आहे की, महाराष्ट्रात विखे कुटुंबातील खासदार पराभूत झाला असला तरी स्वीडनमध्ये निवडून आला, असे सुजय विखे पाटील बोलत असल्याचा व्हिडिओ कुणीतरी मला पाठविला. हे पाहून आश्चर्य वाटल्याचे नीला विखे पाटील यांनी मुलाखतीत म्हटले आहे.
मागील दशकभरापासून आपण काका आणि चुलत भावाच्या संपर्कात नसल्याचेही नीला यांनी स्पष्ट केले आहे. त्या म्हणाल्या, सुजय विखे यांचा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले. कारण मागील दशकभरापासून त्यांच्याशी माझा कुठलाही संपर्क नाही. मी नियमितपणे भारतात येत असते. आता मी खासदार झाल्यानंतर ते माझ्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यांनी पक्षांतर केले
काका आणि चुलत भावाच्या पक्षांतरावरही नीला विखे पाटील यांनी परखडपणे भाष्य केले आहे. त्यांचे आणि आपले राजकारण वेगळे असल्याचे सांगत त्या म्हणाल्या, 'त्यांनी पक्ष बदलले आहेत. मी माझा पक्ष कधीही सोडणार नाही.' नीला विखे पाटील यांचे हे विधान डोळ्यात अंजन घालणारे आहे. काकांनी मला अभिनंदनासाठी फोन केला, याचे समाधान वाटले. पण त्यापेक्षा अधिक काही नाही, असेही त्या म्हणाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.