प्रज्वल रामटेके
Pune News: राज्यातील स्पर्धा आणि भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पेपरफुटीच्या संघटित गुन्ह्यांमध्ये सहभागी व्यक्ती आणि संस्थांना किमान 10 कोटी रुपयांचा दंड, सात ते दहा वर्षांपर्यंत कारावास आणि मालमत्ता जप्तीची शिफारस करण्यात आली आहे. त्याचबरोबर परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करणे, उत्तरतालिकेवरील हरकत योग्य ठरल्यास त्याचे शुल्कही परत देणे, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढील वर्षाचे परीक्षा वेळापत्रक जाहीर करणे, अशा महत्त्वपूर्ण शिफारशी उच्चस्तरीय समितीने केल्या आहेत.
भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी समितीने सोमवारी आपला दुसरा अहवाल राज्य सरकारला सादर केला. राज्यातील भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी ४ सप्टेंबरला ही समिती स्थापन करण्यात आली होती. यापूर्वी समितीने एमपीएससीच्या गट-क परीक्षेसंदर्भात ४ नोव्हेंबरला पहिला अहवाल सादर केला होता. दुसऱ्या अहवालात पेपरफुटीविरोधी कायद्यात सुधारणा, परीक्षा शुल्क, भरतीचे नियोजन, परीक्षा केंद्रांची व्यवस्था आणि सायबर सुरक्षेबाबत विविध शिफारशी करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) अधिनियम, २०२४ मध्ये सुधारणा करण्याची शिफारस समितीने केली आहे. सध्या संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती किंवा संस्थांना पाच ते दहा वर्षे कारावास आणि किमान एक कोटी रुपये दंडाची तरतूद आहे. त्यात वाढ करून सात ते दहा वर्षे कारावास आणि किमान दहा कोटी रुपये दंड करण्याची शिफारस आहे. तसेच नुकसानीची वसुली आणि मालमत्ता जप्तीची तरतूदही सुचविण्यात आली आहे.
परीक्षेत अनुचित साधनांचा वापर करणाऱ्यांना सध्या तीन ते पाच वर्षे कारावास आणि दहा लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. त्यात वाढ करून पाच ते दहा वर्षे कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड करण्याची शिफारस आहे. गैरप्रकारात सहभागी सेवा पुरवठादार संस्थांना पाच कोटी रुपयांपर्यंत दंड आणि आठ वर्षांसाठी बंदी, तर संबंधित संस्थांच्या संचालकांना पाच ते दहा वर्षे कारावास आणि पाच कोटी रुपये दंड सुचविण्यात आला आहे.
परीक्षा गैरप्रकारांचा तपास जिल्ह्यांमध्ये किमान अपर पोलीस अधीक्षक, तर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात किमान पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत करण्याची शिफारस आहे. गंभीर प्रकरणांच्या तपासासाठी विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन करावे. तसेच या कायद्यांतर्गत दाखल होणारे खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करून प्रलंबित खटले तीन महिन्यांत निकाली काढावेत, असेही समितीने सुचविले आहे.
तसेच उमेदवाराने प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित राहून परीक्षा दिल्यास त्याने भरलेले संपूर्ण शुल्क एमपीएससीमार्फत परत करण्याचा विचार करावा, अशी शिफारस आहे. उत्तरतालिकेवरील उमेदवाराची हरकत योग्य ठरल्यास त्याने भरलेले हरकत शुल्कही परत करावे, असे समितीने सुचविले आहे.
शासकीय विभागांकडून रिक्त पदांची माहिती वेळेत मिळावी, यासाठी एकात्मिक मागणीपत्र प्रणाली विकसित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सर्व नियुक्ती प्राधिकरणांनी दरवर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत रिक्त पदांची मागणी आयोगाकडे पाठवावी. त्यानंतर एमपीएससीने पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक ऑक्टोबरपर्यंत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे. उमेदवारांसाठी महा-आयडी किंवा आधारच्या माध्यमातून एकदाच नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्याची शिफारस आहे. त्यामुळे प्रत्येक परीक्षेसाठी प्रमाणपत्रे पुन्हा अपलोड करण्याची गरज भासणार नाही.
परीक्षांच्या नियोजनासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात कायमस्वरूपी परीक्षा शाखा स्थापन करावी. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस, शिक्षण, परिवहन आणि कोषागार विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन करण्याची शिफारस आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांची स्वतंत्र परीक्षा केंद्र बँक तयार करावी. त्यात केंद्रांची आसनक्षमता, उपलब्ध सुविधा आणि दिव्यांगांसाठीची सुलभता यांची माहिती ठेवून नियमित तपासणी करावी.
परीक्षांवर देखरेख ठेवण्यासाठी एमपीएससी मुख्यालय, जिल्हा स्तर आणि प्रत्यक्ष परीक्षा केंद्र अशा तीन स्तरांवर नियंत्रण केंद्रे स्थापन करण्याची शिफारस आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी महा-सायबरच्या सल्ल्याने सुरक्षा योजना तयार करावी. तसेच आयोगात स्वतंत्र तंत्रज्ञान व सायबर सुरक्षा कक्ष, मुख्य माहिती सुरक्षा अधिकाऱ्याची नियुक्ती आणि सर्व डिजिटल प्रणालींसाठी एकात्मिक माहिती सुरक्षा धोरण तयार करण्याचेही समितीने सुचविले आहे.