Satara DCC Bank Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून शिवेंद्रराजे, उदयनराजे, रामराजेंसह 10 दिग्गज आऊट : गोरे, शंभूराज, मकरंदआबा, बाळासाहेब पाटलांना संधी

Satara Political News : सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी 2011 ठराव झाले असून नव्या सहकार कायद्यानुसार 10 वर्षे कार्यकाल पूर्ण केलेल्या दिग्गज संचालकांना निवडणूक लढवता येणार नाही.

Vijaykumar Dudhale

Satara, 06 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात २०११ ठराव झाले आहेत, त्यामुळे बॅंकेच्या निवडणूक प्रक्रियेला आता वेग आला आहे. मात्र, नव्या सहकार कायद्यानुसार सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा जादा कार्यकाल पूर्ण करणाऱ्या संचालकांना ही निवडणूक लढविता येणार नाही. त्यानुसार विद्यमान अध्यक्ष तथा खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह १० दिग्गजांना निवडणुकीत ‘नो एन्ट्री’ असणार आहे. मात्र, त्यांच्या जागेवर घरातील उमेदवार येणार की निष्ठावंतांना संधी दिली जाणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

नव्या बॅकिंग नियमानुसार हे दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी या बड्या नेत्यांनी निवडणूक स्ट्रॅटेजी आखण्यास सुरुवात केली आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांची भूमिका या निवडणुकीत सर्वांत महत्वपूर्ण ठरणार आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीला जिल्हा परिषद निवडणुकीची पार्श्वभूमी आहे, त्यातच भाजपची महत्वकांक्षी ही बॅंक स्वबळावर ताब्यात घेण्याची आहे, त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची स्ट्रॅटेजी काय असणार, हेही महत्वाचे आहे. तसेच, निवडणुकीतून बाद झालेल्या दिग्गज संचालकांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, विद्यमान दहा संचालकांना निवडणूक लढविता येणार नसली तरी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई , भाजपचे मंत्री जयकुमार गोरे, भाजपचे आमदार अतुल भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे हे सध्या संचालक नाहीत, त्यामुळे त्यांना निवडणूक लढविता येणार आहे. राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची विद्यमान एकच टर्म झाल्याने तेही पुन्हा रिंगणात उतरू शकतात.

केंद्राच्या नव्या बँकिंग नियमन सुधारणा कायद्यात बॅंकांच्या संचालकपदासाठी सलग १० वर्षांची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणाऱ्या संचालकांना तीन वर्षांच्या कूलिंग पिरियडनंतर संधी मिळणार आहे. त्यामुळे निवडणुकीत बाद झालेले शिवेंद्रराजे, उदयनराजे, रामराजे, नितीन पाटील, अनिल देसाई, माजी आमदार प्रभाकर घार्गे तसेच राजेंद्र राजपुरे, दत्तानाना ढमाळ, कांचन साळुंखे, प्रदीप विधाते हे दहा जण कोणाला संधी देतात, याची उत्सुकता आहे.

हे दिग्गज नेते आपल्या जागेवर घरातील व्यक्तील संधी देतात की निष्ठावंत समर्थकांना जिल्हा बॅंकेवर निवडून आणतात, याची उत्सुकता आहे. त्यातच जिल्हा परिषद निवडणुकीपासून महायुतीमधील तीन पक्षच एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून पुढे आलेले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेप्रमाणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतही महायुतीमधील तीन पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा परिषदेप्रमाणे भाजपला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ताब्यात घ्यायची आहे. त्यासाठी भाजपने पूर्ण तयारी केली आहे. ठरावातही त्याचे दर्शन झाले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसही अनेक ठिकाणी प्रबळ असल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे झेडपीप्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. पण स्वतः उमेदवार नसल्यामुळे उमेदवार निवडीचे चॅलेंज तीनही पक्षांपुढे असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT