Solapur, 14 June : सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परत येत असताना पीकअप जीप विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात म्हसवड-पंढरपूर मार्गावर सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथे रविवारी (ता. १४ जून) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.
अपघातामधील मृत आणि जखमी हे पंढरपूर शहराजवळील इसबावी येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे इसबावीत शोककळा पसरली आहे. अपघातामधील मृत आणि जखमी हे एकाच कुटुंबातील असून एकमेकांचे नातेवाईक आहेत.
अपघातामध्ये पूजा अमोल सातोरे (वय २३ वर्षे), आरव अमोल सातोरे (वय ८ वर्षे), इंदूबाई दशरथ बावचे (वय ६० वर्षे), पूजा बालाजी बावचे (वय २७ वर्षे), अश्विनी संदीप बावचे (वय २७ वर्षे), संस्कार संदीप बावचे (वय १४ वर्षे), संस्कृती संदीप बावचे (वय १४ वर्षे), समर्थ बालाजी बावचे (वय ६ महिने, सर्व रा. इसबावी, पंढरपूर) यांचा मृत्यू झाला आहे.
सागर सावकार चौगुले (चालक, वय २५ वर्षे रा. रांजणी, ता. पंढरपूर), संदीप दशरथ बावचे (वय ३६), बालाजी दशरथ बावचे (वय ३२), जिया बालाजी बावचे (वय ४ वर्षे), आरव बालाजी बावचे (वय २ वर्षे, पाच महिने), शशिकला पोपट जाधव (वय ५०) अशी अपघातामधील जखमींची नावे आहेत. जखमींना तातडीने पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सागर चौगुले हे बावचे यांचे नातेवाईक असून हे सर्वजण चौगुले यांच्या मालकीची पीकअप जीप घेऊन सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. आज अमावस्या असल्याने हे सर्व कुटुंबीय आणि एकमेकांचे नातेवाईक हे एकाच वाहनातून देवदर्शनासाठी गेले होते.
सिद्धनाथाचे दर्शन घेऊन गावी इसबावीकडे येत असताना म्हसवड-पंढरपूर मार्गावर माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावालगत आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि पीकअप जीप विहिरीत कोसळली. या अघपतात आठ जणांचा बुडून मृत्यू झाला. पीकअप वाहनातील काही लोकांनी उड्या टाकल्याने ते बचावल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
मृतांच्या वारसांना सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर
तांदूळवाडी येथील अपघातप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक दोघेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.स्थानिक प्रशासनाशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.