राहुल गाडकर
Kolhapur News : शालेय शिक्षण आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील खळबळ उडवून देणारं विधान त्यांनी केलं आहे. केसरकर यांच्या या वक्तव्यामुळे शिक्षण क्षेत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. "शालेय शिक्षण विभागाचा कार्यभार घेतल्यानंतर मला, वर्षाला 25 कोटींची ऑफर देण्यात आली होती, असे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केले आहे. त्यासाठी काही एजंट माझ्याकडे आले होते, असेही केसरकर म्हणाले. पण केसरकरांच्या या वक्तव्यानंतर त्या एजंटची नावं मंत्री केसरकर जाहीर करणार का? अशी चर्चा होताना दिसत आहे.
"मी शालेय विभागाचा कार्यभार स्वीकारला, त्यावेळी माझ्याकडे काही एजंट आले होते. वर्षाला 25 कोटी रुपये देतो. आम्ही आणलेल्या शाळांना परवानगी द्या. यासाठी मला ऑफर आली होती. पण, मी असे केले नाही. आमची काम करण्याची अशी पद्धत नाही. जनतेसाठी आम्ही काम करतो",असेही केसरकर यांनी ठणकावून सांगितले.
तर दुसरीकडे केसरकर म्हणाले "एजंटची नावे द्या आम्ही कारवाई करू" असेही त्यांनी या वेळी सांगितले. मुंबई ही मायानगरी आहे. मुंबई हे कमर्शियल भारताचे कॅपिटल आहे. म्हणून ते आमच्याशी संबंधित असतात, असे समजू नका. कोणत्याही एजंटला बळी पडू नका. त्या एजंटचे काय करायचे, त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तुम्ही फक्त आम्हाला नाव द्या, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, असेही आश्वासन केसरकर यांनी दिले.
केसरकर यांच्या दाव्यावरून अनेक प्रश्न निर्माण होतात. जे एजंट तुमच्याकडे आले. त्यांनी तुम्हाला ऑफर दिली. त्यांची नावं व ओळख तुम्हाला माहिती आहे. त्यांच्यावर काय कारवाई करणार?, असा सवाल जनतेमधून उपस्थित होतोय.