Sachin Kalyanshetti-Abhijeet Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Abhijeet Patil : कल्याणशेट्टींना 7.5 कोटी, बाकीच्या आमदारांना 2.5 कोटीच का?: निधी वाटपावरून अभिजीत पाटील आक्रमक

Disha Committee Meeting : बळीराजा पाणंद रस्ते योजनेच्या निधी वाटपावरून आमदार अभिजीत पाटील यांनी प्रशासनाला जाब विचारला. सचिन कल्याणशेट्टी यांच्या मतदारसंघाला अधिक निधी मिळाल्याने निधी वाटपातील दुजाभावावर नाराजी व्यक्त झाली.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 09 September : मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेच्या निधी वाटपावरून दिशा समितीच्या बैठकीत आमदार अभिजीत पाटील यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी साडेसात कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला असताना अन्य आमदारांच्या मतदारसंघांना केवळ अडीच कोटी रुपयांचा निधी का?, असा सवाल उपस्थित करीत निधी वाटपातील दुजाभावावर आमदार पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिशा समितीची बैठक झाली. या वेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार प्रा. ज्योती वाघमारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत निधीवाटपाचा आढावा घेताना आमदार पाटील यांनी अक्कलकोट आणि अन्य मतदारसंघांना देण्यात आलेल्या निधीतील तफावतीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. एका आमदाराला साडेसात कोटी आणि इतर आमदारांना केवळ अडीच कोटी, असा निधी वाटपाचा निकष नेमका काय आहे? असा थेट सवाल त्यांनी केला.

पाणंद रस्त्यांची झालेली कामेही अनेक ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप त्यांनी केला. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर प्रशासनाने कोणती कारवाई केली, याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून मागितली.

केवळ निधी मंजूर करून कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाचा दर्जा तपासणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरींची कामे पूर्ण होऊनही शेतकऱ्यांना अनुदान मिळत नसल्याचा मुद्दाही आमदार पाटील यांनी उपस्थित केला. काम पूर्ण झाल्यानंतरही अनुदानासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा का करावी लागत आहे, असा सवाल त्यांनी केला.

पाणंद रस्त्यांची मंजूर कामे रद्द का करण्यात आली, याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये निधी, कामाचा दर्जा आणि मंजुरीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी, अशी मागणी त्यांनी केली.

आरोग्य केंद्रांच्या 21 कोटींचे काय केले?

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी 21 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, या निधीचा नेमका कसा वापर करण्यात आला, किती कामे झाली आणि किती निधी खर्च झाला, याची माहिती स्पष्टपणे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली.

आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी आलेल्या निधीचा विनियोग नेमका कुठे आणि कशाप्रकारे झाला, याबाबत त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. यासंदर्भातील सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT