Satara Andolan Pramod Ingale, Satara
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : जमावबंदी आदेशामुळे पोलिसांनी मूक मोर्चा रोखला; आंदोलकांवर केली कारवाई

Pusesavali Dangal पुसेसावळी येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) विविध पक्ष, परिवर्तन आणि पुरोगामी संघटनांनी सातारमध्ये मूक मोर्चाचे आयोजन केले होते.

Umesh Bambare-Patil

Satara All Party Andolan : पुसेसावळी येथील दंगलीस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाईच्‍या मागणीसाठी मंगळवारी सातारा येथे सर्वपक्षीय, पुरोगामी-परिवर्तनवादी संघटना व मुस्‍लिम बांधवांच्‍या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले होते. पण, जमावबंदी आदेश लागू असल्‍याने पोलिसांनी मनाई केली. यामुळे जमावाने जोरदार घोषणाबाजी केली. सरतेशेवटी पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी अनेकांना ताब्‍यात घेतले. तर दंगलीच्‍या सूत्रधारांवर कारवाई न झाल्‍यास शनिवारी मोर्चा काढण्‍याचा इशारा दिला.

पुसेसावळी येथील दंगलीनंतर Pusesavali Dangal जिल्‍ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. शांतता प्रस्‍थापित होण्‍याबरोबरच दंगलीतील सहभागी घटकांवर कारवाईसाठी पोलिस दल Satara Police सक्रिय झाले आहे. सोमवारी जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयाच्‍या आवारात जमून समाजबांधवांनी मृत नूरहसन शिकलगार यांचा मृत्‍यू, तसेच दंगलीस कारणीभूत असल्‍याचा आरोप करत भाजपचे प्रदेश उपाध्‍यक्ष विक्रम पावसकर यांच्‍या अटकेची मागणी केली होती.

या मागणीसाठी त्‍याठिकाणी जमावाने जोरदार घोषणाबाजी देखील केली होती. जमावाच्‍या भावना लक्षात घेत पोलिसांनी दंगल, तसेच खूनप्रकरणी पुरवणी जबाब नोंदवून घेण्‍याची कार्यवाही सुरू केल्‍यानंतर नूरहसन यांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्‍यात घेतला.

मंगळवारी विविध पक्ष, समता, परिवर्तन आणि पुरोगामी संघटनांच्‍या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले होते. यासाठी सर्वांना सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्याच्‍या परिसरात जमण्‍याचे आवाहन करण्‍यात आले होते. यानुसार सकाळपासूनच याठिकाणी शहरासह तालुक्‍याच्‍या विविध भागांतील मुस्‍लिम समाजबांधव जमण्‍यास सुरुवात झाली.

या मोर्चाची माहिती मिळाल्‍याने याठिकाणी मोठा बंदोबस्‍त सातारा शहर, तसेच शाहूपुरी पोलिस ठाण्‍याच्‍या वतीने तैनात करण्‍यात आला होता. जमाव वाढू लागल्‍यानंतर पुन्‍हा एकदा बंदोबस्‍तात वाढ करण्‍यात आली. जमाव मोर्चावर ठाम राहून जोरदार घोषणाबाजी करत होता. जमावबंदी आदेश लागू असल्‍याने मोर्चा काढता येणार नाही, असे पोलिसांकडून वारंवार जमलेल्‍यांना सांगण्‍यात येत होते, तरीही जमाव ठाम होता.

यामुळे त्‍याठिकाणी असणाऱ्या वरिष्‍ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा सुरू केली. चर्चेतून तोडगा निघत नसल्‍याने त्‍याठिकाणच्‍या तणावात वाढ होत होती. असे मरण्‍यापेक्षा... पोलिसांच्‍या गोळ्या खाऊन मरू, अशी भावना यावेळी जमलेले व्‍यक्‍त करत होते. वारंवार सांगूनही जमाव ऐकत नसल्‍याने सरतेशेवटी पोलिसांनी जमलेल्‍या आंदोलकांमधील प्रमुखांना ताब्‍यात घेण्‍यास सुरुवात केली.

याला विरोध दर्शवत जमलेल्‍यांनी सगळ्यांनाच अटक करा, अशी मागणी लावून धरली. यानंतर पोलिसांनी डॉ. आंबेडकर यांचा पुतळा परिसर पूर्णपणे बंदिस्‍त करत जमलेल्‍यांना ताब्‍यात घेत पोलिस ठाण्‍याकडे नेण्‍यास सुरुवात केली. याचदरम्‍यान जमलेल्‍यांपैकी काही आंदोलकांनी त्‍याठिकाणी उपस्‍थित असणाऱ्या वरिष्‍ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करत शुक्रवारपर्यंत सूत्रधारांवर कारवाई न झाल्‍यास शनिवारी मोर्चा काढण्‍याचा इशारा देणारे निवेदन दिले. दुपारी ताब्‍यात घेतलेल्‍या आंदोलकांना सूचनापत्र देऊन पोलिसांनी मुक्‍त केले.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT