Preeti Menon
Preeti Menon Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'आप' आणू पाहतेय महाराष्ट्रात केजरीवालांचे विकासाचे मॉडेल : मुंबई महापालिकेतही दाखविणार ताकद

सरकारनामा ब्युरो

महेश माळवे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - आम आदमी पक्षाने दिल्ली पाठोपाठ पंजाबमध्येही सरकार स्थापन केले आहे. दिल्लीत लोकप्रिय झालेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांचे विकास मॉडेल आप महाराष्ट्रातही आणणार आहे. या संदर्भातील महत्त्वाचे सुतोवाच 'आप'च्या मुंबई अध्यक्ष प्रीती मेनन शर्मा यांनी आज श्रीरामपूर येथे केले. ( 'Aap' is trying to bring Kejriwal's model of development in Maharashtra )

श्रीरामपूर येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल उपस्थित होते.

प्रीती मेनन शर्मा म्हणाल्या, आम आदमी पक्ष देशातील तिसरा मोठा पक्ष ठरला आहे. महाराष्ट्रात आम्हाला मोठा प्रवास करायचा असून दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांचे विकासाचे मॉडेल महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात घेऊन जायचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कार्यकर्ते भेटतील तेथील निवडणुका स्वबळावर लढविल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्या पुढे म्हणाल्या की, मागील वेळी ग्रामपंचायतीत 300, तर पाच पंचायत समित्यांमध्ये उमेदवार दिले होते. यावेळी पालिकांबरोबर सर्व ग्रामीण निवडणुका लढविणार आहोत. मुंबई महापालिकेत सत्ता मिळाली तर वीज व पाणी मोफत दिले जाईल. मुंबईत कोस्टल रोड बनवले जात असून प्रत्येक किलोमीटरला 1300 कोटी रुपये खर्च केला जात आहे. हा जगातील सर्वात महागडा रोड बनत आहे. त्याच्यासाठी मुंबई महापालिका दहा किलोमीटर रस्त्यासाठी 12 हजार 200 कोटी रुपये खर्च करणार आहे. या रस्त्याच्या दोन किलोमीटर किमतीत पूर्ण मुंबईला पाणी, वीज व महिलांना प्रवासही मोफत मिळू शकेल. सरकारकडे पैसे आहेत फक्त गरज आहे ती व्यवस्थित खर्च करण्याची मुंबई मनपाच्या 90 हजार कोटी रुपयांच्या नुसत्या ठेवी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

षड्यंत्र खेळले जातेय

हनुमान चालीसा आमच्या हृदयात आहे. हनुमान चालीसाला राजकारणात आणून खूप मोठे षड्यंत्र खेळले जात आहे. यामागे फक्त भाजपचा हात आहे. राणा व राज ठाकरे हे केवळ मोहरे आहेत. राज ठाकरेंनी भोंग्याचा विवाद समोर आणल्याने आमची काकड आरती बंद झाली. सामाजिक प्रश्न म्हणून राज ठाकरे सांगतात. असे असेल तर ट्रॅफिक सिग्नल व ज्या ठिकाणी यांच्या रॅलीचे हल्ले केले जातात तेथे ढोल वाजवावे व हनुमान चालीसा म्हणावे, अशी खोचक टीका त्यांनी केली. राज ठाकरे यांचा एक आमदार व एक नगरसेवक शिल्लक आहे. त्यामुळे स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. राज ठाकरे मराठी अस्मितेसाठी काहीतरी करतील असे वाटत होते. मात्र, आता ते सुपारीसारखे वाटू लागले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

भाजपने राजकारण खालच्या पातळीवर नेले

भाजपने राजकारण खूप खालच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे. महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून दिशाभूल केली जात आहे. धर्म धर्म व जाती जातीत वाद लावले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

श्रीरामपूरचा विकास खुंटला

श्रीरामपुरात घराणेशाही व नात्यागोत्याचा राजकारणामुळे विकास होऊ शकला नाही. आरोग्य शिक्षण व्यवस्था उभी राहू शकली नाही. एमायडिसी असूनही उद्योग न आल्याने रोजगार निर्माण होऊ शकले नाहीत. हे शहर फक्त निवृत्त लोकांना राहण्याचे ठिकाण बनले आहे. या ठिकाणी आम्हाला चांगले उमेदवार मिळाले आणि सत्ता आली तर श्रीरामपूरचे बजेट पाहून आम्ही वीज व पाणी मोफत देण्याचा विचार करू, तसेच शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT