Minister Abdul Sattar News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Abdul Sattar News : शिवीगाळ करणाऱ्या मंत्री सत्तारांना उपरती, म्हणाले...

Marathwada Political News : गौतमी पाटील यांची लावणी पाहण्यासाठी महिला आल्या होत्या. कार्यक्रमातच लोकांवर पोलिसांकडून लाठ्या चालवल्या.

Jagdish Pansare

Sillod : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सिल्लोड महोत्सवात गौतमी पाटीलची लावणी सुरू असताना गोंधळ उडाला. हुल्लडबाज तरुणांना आवर घालताना अब्दुल सत्तार यांनी माईक हाती घेत थेट पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. गोंधळ घालणाऱ्यांना सोलून काढा, असे म्हणताना त्यांनी शिवीगाळही केली. स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमातच लोकांवर पोलिसांकडून लाठ्या चालवल्या, त्यांना शिवीगाळ केल्याने सत्तार यांच्यावर टीका होती. त्यांच्याविरोधात सामान्य नागरिक संताप व्यक्त करत होते.

चोहोबाजूंनी टीकेची झोड उठत असताना आता सत्तार यांना उपरती आली असून लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो, असे म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. सिल्लोड महोत्सवात गौतमी पाटील यांची लावणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला, लहान मुले-मुली आल्या होत्या. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न होता. म्हणून मी ग्रामीण भाषेचा वापर करत गर्दीला आवरण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अब्दुल सत्तार यांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी दिसेल त्याला काठ्यांचा प्रसाद दिल्याने सिल्लोड महोत्सव आणि सत्तारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला बुधवारी गालबोट लागले. गर्दीला शांत करण्यासाठी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे धडे देणाऱ्या सत्तार यांनी जाहीरपणे शिवीगाळ करीत आपल्या असंस्कृतपणाचे प्रदर्शन केले. त्यानंतर सत्तार यांच्यावर मोठ्या प्रमाणत टीका होत होती.

सत्तार म्हणाले, बुधवारी संध्याकाळी सिल्लोड शहरामध्ये गौतमी पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात पन्नास ते साठ हजार लोकांनी हजेरी लावली होती. पण विरोधकांनी काही हुल्लडबाज तरुण या गर्दीत घुसवले होते. चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा आणि त्याला बदनाम करण्याचा त्यांच्या प्रयत्न होता. अशा लोकांना रोखण्यासाठी ग्रामीण भाषेचा वापर करीत मी बोललो. पण यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, त्यांच्या मनात शंका-कुशंका निर्माण झाल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

कार्यक्रमाला 20 हजार महिला, त्यांच्यासोबत लहान मुलंही आली होती. त्यांना इजा होऊ नये, म्हणून मी संतापलो होतो. माझ्या बोलण्याने कुणाची मने दुखावली असतील तर मी खेद व्यक्त करतो, असेही सत्तार म्हणाले. दरम्यान, सत्तार यांनी गर्दीला आवरण्यासाठी जी शिवराळ आणि अपमानास्पद भाषा वापरली ती त्यांना शोभत नाही. 'जो हौंद से गयी, वो बूँद से नहीं आती,' अशा प्रतिक्रिया सत्तार यांनी खेद व्यक्त केल्यानंतर सर्वसामान्यांमधून उमटत आहेत.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT