Solapur, 08 October : माढ्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. माढा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हे उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुलाखतीसाठी पुण्याच्या निसर्ग मंगल कार्यालयात दाखल झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे गेलेले अभिजीत पाटील विधानसभा निवडणुकीत तिकिटासाठी पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेल्याने राजकीय निरीक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात सुरू आहेत. जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केलेले अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतींसाठी पुण्यात पोचले आहेत, त्यामुळे शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी दिली जाते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अभिजीत पाटील ()Abhijeet Patil हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मदतीच्या आश्वासनानंतर भाजपसोबत गेले होते. भाजपकडून त्यांच्या कारखान्याला मदतही करण्यात आली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी भाजपपासून लांब राहिल्याचे दिसून येत होते.
अभिजीत पाटील यांनी महिना दीड महिन्यापूर्वी माढा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, त्यादृष्टीने त्यांनी गेल्या महिनाभरापासून माढ्यात प्रचार सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांना त्यांनी आव्हान दिले असून शिंदे यांच्याकडूनही अभिजीत पाटील यांच्यावर मुद्द्याच्या आधारे टीका केली जात आहे
दुसरीकडे महायुतीमध्ये गेलेले बबनदादा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, शरद पवार यांनी अजूनही त्यांच्या मुलासाठी उमेदवारीचा शब्द दिलेला नाही. एकीकडे बबनदादा शिंदे हे तुतारीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अभिजीत पाटील हे मात्र तुतारीच्या मुलाखतीसाठी पोचले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.