Abhijeet Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Abhijeet Patil News : अभिजित पाटलांची आमदारकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी : यात्रा-जत्रांतून वाढविला मंगळवेढ्यात संपर्क

आतापर्यंत पंढरपूर विधानसभेच्या आखाड्यात तिरंगी लढतीत येणारा निकाल हा धक्कादायक लागला आहे, त्यामुळे येणारी निवडणूक तिरंगी की चौरंगी होते, हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा विधानसभेचे संभाव्य उमेदवार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी मंगळवेढ्यात (Mangalveda) संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवेढा तालुक्यातील अनेक ग्रामदैवतांचे दर्शन घेत आगामी विधानसभा निवडणुकीची चाचपणी ते करत आहेत. (Abhijeet Patil extended contact in Mangalveda taluka)

विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ‘विठ्ठल’चा अध्यक्ष हा आमदारकीचा दावेदार असतो, या न्यायाने विधानसभेसाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तशी मोर्चेबांधणीही खुद्द अभिजित पाटील यांनी सुरू केली आहे. मात्र मतदारसंघ पंढरपूर की माढा हा विषय तेवढा अनुत्तरीत आहे. मंगळवेढा येथे उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी योगदान देण्याचा संकल्प जाहीर केल्यानंतर त्यांचे नाव तालुक्याच्या राजकीय वर्तुळात आले.

नववर्षाच्या सुरुवातीला मंगळवेढा तालुक्यामध्ये सिद्धापूर येथे मार्तुलिंग गणपतीचा आशीर्वाद घेतल्यानंतर अभिजित पाटील यांनी गणपतीचा आशीर्वाद घेतला. नववर्षात मतदाराचा आशीर्वाद घेणार का असे वृत्त ‘सरकारनामा’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर त्यांचे राजकीय संपर्क दौरेही वाढीस लागले. चैत्र महिन्यामध्ये तालुक्यामध्ये बहुतांश गावाच्या जत्रा सुरू आहेत. प्रत्येक ग्रामदैवताच्या यात्रेला त्यांची उपस्थिती दिसून येऊ लागली आहे.

मारोळी व चिकलगी येथील बागडे बाबांचा आश्रम, सिद्धापूर, मरवडे ,भोसे, रेड्डे, शिरनांदगी याचबरोबर मंगळवेढ्यातील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव व गैबीपूर उरूसाला त्यांची उपस्थिती दिसून आली. सध्या रमजानमध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी इफ्तार पार्टी ठेवून मुस्लिम मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न चालवला आहे. अभिजीत पाटील यांनीही गैबीपीर दर्गा येथे इप्तार पार्टीचे आयोजन केले होती.त्यामध्ये हजेरी लावत मुस्लिम बांधवांशी इप्तार पार्टीतून संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला.

मंगळवेढा तालुक्यात त्यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने नसले तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हे तालुक्याच्या त्यांच्या राजकीय प्रवेशाला फायदेशीर ठरवू लागले आहेत. त्यांचा तालुक्यातील वाढता राजकीय संपर्क पाहता ते आमदारकीचे दावेदार मानले जाऊ लागले आहेत. मात्र, ते कोणत्या पक्षाच्या वळचणीला जातात, याविषयी तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

राज्यातील सत्ता बदलानंतर आमदार समाधान आवताडे यांनी तालुक्यातील रखडलेल्या प्रश्नावर कोट्यवधींचा निधी मिळविला आहे. त्यामुळे ते भाजपचे संभाव्य उमेदवार मानले जातात. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे निसट्या मताने पराभव झाल्यामुळे ते पतीदेखील नेटाने प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत पंढरपूर विधानसभेच्या आखाड्यात तिरंगी लढतीत येणारा निकाल हा धक्कादायक लागला आहे, त्यामुळे येणारी निवडणूक तिरंगी की चौरंगी होते, हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक गटही यामध्ये निर्णय भूमिका बजावू शकतो. मात्र, तत्पूर्वी लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रंगीत तालमीत कोण पास होणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT