Abhijeet Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Assembly Constituency: प्रतीक्षा संपली...माढ्यातून अभिजीत पाटील यांना तुतारीची उमेदवारी

Madha Assembly NCPSP Candidate Abhijeet Patil: अभिजीत पाटील यांना लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत जावे लागले. ऐन लोकसभा निवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली होती. त्यातून सुटका करून घेण्यासाठी अभिजित पाटील यांनी शरद पवारांना सोडून भाजपसोबत जाणे पसंत केले होते.

Vijaykumar Dudhale

Solapur, 28 October : सर्वाधिक उत्सुकता लागून राहिलेल्या माढा मतदारसंघातून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूजमध्ये अभिजीत पाटील यांना एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून अखेर अभिजीत पाटील हे तुतारीच्या चिन्हावर माढ्याच्या रिंगणात असणार हे आता स्पष्ट झाले आहे. आता महायुतीच्या उमेदवाराची उत्सुकता आहे.

माढा विधानसभा मतदारसंघासाठी (Madha Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सर्वाधिक इच्छुकांची संख्या होती. याशिवाय काही मोठी नावेही उमेदवारीसाठी चर्चेत होती. यामध्ये आमदार बननराव शिंदे, त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे, भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश होता. मात्र, शरद पवार यांनी अखेर अभिजीत पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे.

अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांना लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत जावे लागले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली होती. त्यातून सुटका करून घेण्यासाठी अभिजित पाटील यांनी शरद पवारांना सोडून भाजपसोबत जाणे पसंत केले होते.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मदत मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटत आपल्याला सर्व पर्याय खुले असल्याचे म्हटले होते, त्यानुसार त्यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून त्यांना माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे.

आमदार बबनराव शिंदे यांनीही तुतारीच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांच्याकडे अखेरपर्यंत प्रयत्न केले आहेत. मात्र, त्यांना शरद पवार यांच्याकडून तुतारीची उमेदवारी देण्यात आलेली नाही, त्यामुळे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे माढ्यातून अपक्ष निवडणूक लढवतील, अशी घोषणा आमदार बबनराव शिंदे यांनी यापूर्वीच केली होती.

दरम्यान, अभिजीत पाटील यांनी यापूर्वीच माढा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. माढ्यात आता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यात महाविकास आघाडीकडून अभिजीत पाटील, रणजितसिंह शिंदे हे अपक्ष, तर महायुतीही आपला उमेदवारही माढ्यातून उतरवू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT