Madha Assembly Constituency: माढ्याच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम; तुतारीचा उमेदवार ठरत नसल्याने महायुतीचेही घोडे अडले

Maharashtra Assembly Election 2024: सर्वाधिक उत्सुकता लागलेल्या माढा विधानसभा मतदारसंघाची महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारीची मोठी उत्सुकता आहे.
Abhijeet Patil-Babanrao Shinde
Abhijeet Patil-Babanrao ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 October : सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातील महायुतीचा, तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होण्याचे बाकी आहे. मात्र, सर्वाधिक उत्सुकता लागलेल्या माढा विधानसभा मतदारसंघाची महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.

त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारीची मोठी उत्सुकता आहे. कारण तुतारीच्या उमेदवारीसाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत, त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला मिळते, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

माढा विधानसभा मतदारसंघातून (Madha Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुकांची सर्वाधिक संख्या आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, संजय कोकाटे, संजय पाटील घाटणेकर, मीनल साठे आदी प्रमुखांचा त्यामध्ये समावेश आहे. या सर्वांनी पवारांची अनेकदा भेट घेतली आहे. मात्र, त्यांनी कोणालाही उमेदवारीचा शब्द दिलेला नाही.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. मात्र, मोहिते पाटील यांनी अद्याप आपले पत्ते ओपन केलेले नाहीत, त्यामुळे माढ्यात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता कायम आहे.

आमदार बबनराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत, त्यासाठी त्यांनी राजकीय विरोधक असलेल्या मोहिते पाटील यांच्याशी जुळवून घेण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, मोहिते पाटील यांच्याकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा आहे, त्यामुळे पवारांकडूनही त्यांना ठोस शब्द अद्याप मिळालेला नाही.

Abhijeet Patil-Babanrao Shinde
Chandgad : चंदगडमध्ये महायुतीत उभी फूट; राष्ट्रवादी आमदाराविरोधात भाजप नेत्याने शक्तिप्रदर्शनाने भरला अर्ज

दरम्यान, तुतारीची उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी त्यांनी केली होती. मात्र बबनराव शिंदे यांनी अजूनपर्यंत प्रयत्न सोडलेला नाही, त्यांचे तुतारीच्या उमेदवारीसाठी अद्यापही प्रयत्न सुरू असून पवारांच्या भेटीसाठी धडपड करत आहेत.

दुसरीकडे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनीही माढ्यातून दंड थोपटले आहेत, त्यामुळे त्यांचेही नाव माढ्यातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी चर्चेत आहे. मात्र, त्यांनाही पवारांनी ठोस आश्वासन दिले नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे माढ्याच्या उमेदवारी सस्पेन्स कायम आहे. महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे माढ्याचा उमेदवार कोण असणार, याची प्रतीक्षा सोलापूर जिल्ह्यातील जनतेला आहे.

Abhijeet Patil-Babanrao Shinde
Siddhi Kadam : ‘सिद्धी कदमांची उमेदवारी म्हणजे नुरा कुस्ती, डमी उमेदवार’; मोहोळच्या नाराज नेत्यांनी घेतली पवारांची भेट...

महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नसल्यामुळे महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचाही उमेदवार अजून ठरलेला नाही. कदाचित शरद पवार यांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही उमेदवार जाहीर होऊ शकतो. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदारसंघाचे उमेदवार जाहीर झाले असताना मात्र माढ्याची प्रतीक्षा कधी संपणार, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com