Abhijeet Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Abhijeet Patil : ऐनवेळी माढ्यातून बाजी मारलेल्या अभिजीत पाटलांचा पंढरपूर-मंगळवेढ्यात जीव अडकला!

Pandharpur-Mangalvedha Politic's : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणकीच्या संदर्भात अभिजीत पाटील यांनी आपला गट मजबूत करण्याचा प्रयत्न चालवल्याचे मानले जात आहे.

हुकूम मुलाणी

Mangalvedha, 14 April : एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी उमेदवारी जाहीर झालेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना ऐनवेळी माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवावी लागली. ऐनवेळी उमेदवारी जाहीर होऊन अभिजीत पाटील यांनी माढ्यातून बाजी मारली. मात्र, पंढरपूर-मंगळवेढ्यातील जोडलेल्या कार्यकर्त्यांमुळे त्यांचा जीव अजूनही मतदारसंघात अडकल्याचे दिसून येत आहे.

आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करणारे फलक मंगळवेढ्यात लावले आहेत. त्या माध्यमातून आमदार पाटील यांनी आपल्या हक्काचा मतदारसंघात संपर्क राहील, याची दक्षता घेतली आहे. याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिजीत पाटील यांनी पंढरपूर मतदारसंघातील प्रश्नही विधानसभेत उपस्थित केले होते, त्यामुळे माढ्यातून जिंकलेल्या अभिजीत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यात हातचा राखून ठेवण्याचा प्रयत्न चालवल्याचे दिसून येत आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमातून अभिजीत पाटील यांची पंढरपूर-मंगळवेढा (Pandharpur-Mangalvedha) मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर एकासंघ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. पाटील यांनी मतदारसंघात दोन ते अडीच वर्षे संपर्क मोहिम राबवली होती. पंढरपुरातून आमदार व्हायचं, असा चंग बांधलेल्या अभिजित पाटील यांंनी मंगळेवढ्यात जोरदार मोर्चेबांधणी केली हेाती.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अभिजीत पाटील यांनी मंगळवेढ्यात जोरदार साखरपेरणी केली होती. अनेक कार्यक्रमाला हजेरी लावून आर्थिक रसदही पुरवली होती. मात्र, राजकीय घडामोडीत पाटील यांना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून माघार घ्यावी लागली. त्यांना शेजारच्या माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. त्या निवडणुकीत माढ्यातून त्यांनी बाजी मारली.

मंगळवेढा तालुक्यातील संपर्कामुळे जोडले गेलेले कार्यकर्ते सोबत होते. कार्यकर्त्यांचा तो संच अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या पाठीशी उतरवला होता. त्यातून त्यांना सावंत यांना सुमारे 11 हजारांच्या आसपास मते मिळाली आहेत. मात्र ती मते भगीरथ भालके यांच्या पराभवास कारणीभूत ठरली आहेत.

माढ्यातून आमदार झालेल्या अभिजीत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न मांडला होता. तसेच तालुक्यातील मृत कुटुंबीयांना भेटी देत आहेत. तसेच, सध्या सुरू असलेल्या गावोगावच्या यात्रांनाही अभिजीत पाटील हे हजेरी लावत आहेत, त्यामुळे माढ्यातून आमदार झालेल्या अभिजीत पाटील यांचा जीव मंगळवेढ्यात अडकल्याचे मानले जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणकीच्या संदर्भात अभिजीत पाटील यांनी आपला गट मजबूत करण्याचा प्रयत्न चालवल्याचे मानले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात आमदार अभिजीत पाटील यांनी अभिवादनाचे फलक लावले आहेत. विशेष म्हणजे भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या बॅनरशेजारीच पाटील यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. आमदार आवताडे यांच्या फलकाशेजारी लावलेला आमदार अभिजीत पाटील यांचा फलक भविष्यातील राजकीय मोर्चेबांधणीचे संकेत मानले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT