Abhijeet Patil Mangalvedha Office Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Abhijeet Patil : अभिजीत पाटलांची राष्ट्रवादीत घरवापसी होणार? संपर्क कार्यालयावरील काढलेला फलक पुन्हा लावला

Pandharpur-Mangalvedha Assembly Election : मंगळवेढ्यातील त्यांच्या कार्यालयात शरद पवार यांच्या छायाचित्रासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा लोगो अजूनही कायम आहे.

हुकूम मुलाणी

Mangalvedha, 20 June : विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीच्या कारवाईमुळे अभिजीत पाटील यांना शरद पवार यांना सोडून भाजपच्या गोटात जावे लागले. मात्र, अभिजीत पाटील यांचे पवारांवरील प्रेम अजूनही कायम असल्याचे दिसून येते.

कारण, मंगळवेढ्यातील त्यांच्या कार्यालयात शरद पवार यांच्या छायाचित्रासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा लोगो अजूनही कायम आहे. सध्याचे राजकीय वातावरण पाहता अभिजीत पाटील यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी घरवापसी होणार का? याची चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत विठ्ठल कारखान्याच्या कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमात अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता. त्या प्रवेशाच्या कार्यक्रमात पाटील यांच्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा उमेदवारीचे सूतोवाच केले होते, तर पुढे त्यावर शिक्कामोर्तब करून पवारांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती.

अभिजीत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एन्ट्री होताच भगीरथ भालके हे पक्षापासून दुरावयला सुरुवात झाली हेाती. पुढे त्यांनी राष्ट्रवादीतून तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला होता.

मात्र, तेलंगणा विधानसभा निवडणुकीत केसीआर यांच्या पक्षाचा पराभव झाला, त्यामुळे बीआरएसचे तेलंगणाबाहेरील काम थंडावले आहे, त्यामुळे भगीरथ भालकेही महाविकास आघाडीत परतणार असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील आदी मातब्बरांची फौज होती. महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांनी प्रणिती शिंदे यांच्यासाठी काम केले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात प्रकट झालेला रोष विधानसभा निवडणुकीत कॅश करण्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात आहे.

विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील, प्रशांत परिचारक यांची नावे चर्चेत आहेत, त्यामुळे महायुती आणि महाआघाडीकडून कोणाला संधी मिळते, याची प्रचंड उत्सुकता पंढरपूर-मंगळवेढ्यात आहे.

भाळवणी येथील कार्यक्रमात बोलताना अभिजीत पाटील यांनी मी विधानसभेचा दावेदार असून मीच मैदान मारणार आहे, असे विधान केले होते. त्यावेळी त्यांना आबा तुमचा पक्ष कोणता? असा प्रश्न विचारला होता, त्याच वेळी नेमके ‘डीजे’वर राष्ट्रवादीचे गाणे वाजत होते.

ते ऐकत स्मितहास्य केले होते. त्यामुळे अभिजीत पाटील यांच्या संपर्क कार्यालयावरील फलक आणि विधानसभेसंदर्भात केलेला दावा यामुळे अभिजीत पाटील यांची घरवापसी होणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

अभिजीत पाटील यांच्या मंगळवेढ्यातील जनसंपर्क कार्यालयावरील फलक लोकसभा निवडणुकीनंतर काढण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी तो फलक पुन्हा लावण्यात आला आहे. त्या फलकाबरोबर शरद पवार यांच्या छायाचित्रासह राष्ट्रवादी काँग्रेसचा लोगो असलेला फलकही कायम आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT