Pandharpur, 28 July : महायुती सरकारकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला तब्बल ३४७ कोटी रुपयांच्या थकहमीचा ‘बूस्टर डोस’ मिळाल्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांचे पंढरपूरमध्ये ‘भावी आमदार’ असे बॅनर झळकले आहेत.
त्यामुळे अभिजीत पाटील हे विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाल्याची चर्चा आहे. मात्र, पाटील हे कोणत्या पक्षाकडून कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, याची उत्सुकता कायम आहे.
अभिजीत पाटील (Abhijeet Patil) अध्यक्ष असलेल्या पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला (Vitthal Sugar Factory) एनसीडीसीकडून नुकतेच 347 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. त्यासाठी राज्य सरकारने थकहमी घेतली आहे. त्यामुळे पाटील यांच्यासमोरील कारखान्याची मोठी अडचण दूर झाली आहे. या कर्जाच्या रकमेतून विठ्ठल कारखान्याची जुनी देणी दिली जाऊ शकतात.
दरम्यान, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांचे पंढरपूर शहरात भावी आमदार म्हणून फ्लेक्स झळकले आहेत. लोकसभा निवडणुकीपासून अभिजीत पाटील हे भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. पंढरपुरात भावी आमदार असे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरून पंढरपुरातून अभिजीत पाटील यांची विधानसभेची तयारी सुरू आहे, असे मानले जात आहे.
अभिजीत पाटील अपक्ष लढणार की अन्य पक्षातून लढणार या विषयी संभ्रम कायम आहे. कारण पंढरपूर मतदारसंघात समाधान आवताडे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्याचबरोबरच प्रशांत परिचारक हे माजी आमदारही विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. त्यात आता अभिजीत पाटील यांची भर पडली आहे, त्यामुळे भाजपकडून नेमके कोणाला तिकिट भेटते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
दरम्यान, मध्यंतरी माढा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना अभिजीत पाटील यांनी आपण विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, मतदारसंघाबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नव्हते. तसेच ते कोणत्या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत, याबाबतही त्यांनी कोणतीही वाच्यता केलेली नव्हती, त्यामुळे ते कोणत्या मतदारसंघातू कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवतात, हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.