Solapur, 28 July : विधानसभेचे माजी सभापती तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले हरिभाऊ ऊर्फ नाना बागडे यांना थेट राज्यपालपदी संधी देत भाजपने निष्ठावंतांचा सन्मान केल्याची भावना राजकीय वर्तुळात आहे.
हरिभाऊ बागडे राजस्थानच्या राजभवनात कारभार हाकणारे सहावे मराठी नेते आहेत. वसंतदादा पाटील यांच्यापासून राजस्थानशी जुळलेले नाते बागडे यांच्यापर्यंत कायम आहे. बागडे यांच्या नियुक्तीने त्या प्रतिभासंपन्न परंपरेला पुन्हा उजाळा मिळाला आहे.
राजस्थानचे राज्यपाल (Rajasthan Governor) म्हणून आजपर्यंत पाच मराठी नेत्यांनी काम केले आहे. शनिवारी मध्यरात्री निघालेल्या ऑर्डरमध्ये हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांच्याकडे राजस्थानच्या राज्यपालपदाची धुरा देण्यात आली आणि सहावे मराठी नेते राजस्थानचे प्रमुख (राज्यपाल) बनले. हरिभाऊ बागडे यांच्याबरोबर दहा जणांची नियुक्ती राज्यपालपदांवर करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, राजस्थानचे राज्यपाल म्हणून काम करणारे पहिले मराठी नेते हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे आहेत. वसंतदादा हे 1980 च्या दशकात राजस्थानचे राज्यपाल बनले होते. त्यांनी 20 नोव्हेंबर 1985 ते 15 आक्टोबर 1987 असे सुमारे एक वर्षे 329 दिवस राज्यपाल म्हणून राजस्थानचा कारभार पाहिला आहे.
वसंतदादा पाटील यांची इच्छा नसतानाही काँग्रेस हायकमांडने त्यांना राजस्थानात पाठविले होते. वसंतदादांचे मन राजस्थानच्या राजभवनात कधीही रमले नाही. राजस्थानच्या राजभवनातूनही त्यांचे लक्ष कायम महाराष्ट्राकडे लागलेले असायचे. त्यामुळे वसंतदादांना इच्छेविरोधातच राजस्थानमध्ये राहावे लागले होते.
वसंतदादा पाटील यांच्यानंतर प्रतिभाताई पाटील यांनीही राजस्थानचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. प्रतिभा पाटील यांनी 8 नोव्हेंबर 2004 रोजी राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतली. त्या 21 जून 2007 पर्यंत म्हणजे तब्बल 2 वर्षे 225 दिवस राजस्थानच्या राजभवनात कार्यरत होत्या. पुढे प्रतिभाताई या देशाच्या राष्ट्रपती झाल्या.
राजस्थानात प्रतिभाताईंनंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते प्रभा राव या २५ जानेवारी 2010 ते 25 एप्रिल 2010 दरम्यान राज्यपाल झाल्या. पण, त्या फक्त 53 दिवसच राज्यपाल म्हणून कार्यरत राहिल्या. तत्पूर्वी 3 डिसेंबर 2009 ते 24 जानेवारी 2010 पर्यंत त्यांच्याकडे राजस्थानच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. या काळात त्या हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल होत्या.
प्रभा राव यांच्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांच्याकडेही राजस्थानच्या राज्यपालपदाचा कार्यभार होता. शिवराज पाटील हे 28 एप्रिल 2010 ते 11 मे 2012 पर्यंत म्हणजेच दोन वर्षे 16 दिवस राज्यस्थानचे अतिरिक्त राज्यपाल होते. याच काळात त्यांच्याकडे पंजाबचे राज्यपालपदही होते. शिवराज पाटील हे काँग्रेस हायकमांडच्या अत्यंत निकटवर्तीय होते. त्यामुळे मनमोहनसिंग सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये ते केंद्रीय गृहमंत्री बनले होते.
भाजपचे नेते राम नाईक यांनीही राजस्थानचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. मात्र, त्यांच्याकडे हा पद्भार केवळ 26 दिवस इतकाच होता. ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. राम नाईक हे पहिले मराठी भाजप नेते राजस्थानचे राज्यपाल बनले होते. नाईक यांच्यानंतर आता हरिभाऊ बागडे यांचा नंबर लागला आहे.
हरिभाऊ बागडे
हरिभाऊ बागडे हे 1985मध्ये औरंगाबाद (सध्याचे छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघातून पहिल्यांदा विधान सभेची निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात ते विजयी झाले. त्यानंतर ते सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात बागडे हे रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री हेाते. राज्यात 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बागडे हे विधानसभेचे सभापती होते. आता त्यांच्याकडे राजस्थानच्या राज्यपालपदाची सूत्रे असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.