Adani Green Energy Tarali Project News : सह्याद्रीच्या कुशीतील रायगड जिल्ह्यातील सायडोंगर परिसरातील जंगलतोडीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असतानाच सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात प्रस्तावित अदानी समूहाच्या तारळी पंप स्टोरेज प्रकल्पावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मूळ पर्यावरण परवानगीत नमूद नसलेल्या सावरघर गावात मोठ्या प्रमाणावर उत्खनन व बांधकाम सुरू असल्याने महाराष्ट्र वनविभागाने या प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही सावरघर गावातील काम तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अदानींच्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारचा दुसरा दणका मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील पाटण तालुक्यात उभारण्यात येत असलेला ‘अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड’चा ‘तारळी पंप स्टोरेज’ प्रकल्प चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या प्रकल्पाला विरोध होताना दिसत असून, त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्र वनविभागाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील क्षेत्राजवळ असलेल्या या प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक पूर्वपरवानगी न घेताच काम सुरू केल्याचा ठपका ठेवला होता. तसेच १३ नोव्हेंबर रोजी या प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते.
यानंतर आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अर्थात MPCB नेही या प्रकल्पाचे सावरघर गावातील काम तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणविषयक आवश्यक पूर्वपरवानगी न घेता येथे उत्खनन आणि बांधकाम सुरू असल्याचा ठपका मंडळाने ठेवला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस यांनी शुक्रवारी (२० नोव्हेंबर) कंपनीला यासंदर्भात अधिकृत पत्र पाठवून काम थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच, “नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सुरू असलेले उत्खनन तसेच बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे. मंडळाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही काम पुन्हा सुरू करू नये. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास जल आणि वायू प्रदूषण प्रतिबंधक कायद्यान्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्याशिवाय मंडळाकडे दुसरा पर्याय राहणार नाही,” असा स्पष्ट इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने पत्राद्वारे दिला आहे.
नेमका आक्षेप काय?
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पत्रात नमूद केल्यानुसार, कंपनीने सावरघर गावात कामगारांच्या तात्पुरत्या निवासासाठी आणि साठवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर उत्खनन व बांधकाम केले आहे. विशेष म्हणजे, यासाठी मंडळाची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नाही. यापूर्वी १,५०० मेगावॅट क्षमतेच्या ‘तारळी पंप स्टोरेज प्रकल्पा’साठी मंडळाने काही अटींवर काम सुरू करण्याची परवानगी दिली होती.
जल प्रदूषण प्रतिबंधक कायदा (१९७४), वायू प्रदूषण प्रतिबंधक कायदा (१९८१) आणि घातक कचरा व्यवस्थापन नियमांनुसार ही परवानगी देण्यात आली होती. यासाठी मात्र प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारणे आणि नियमांचे काटेकोर पालन करणे कंपनीवर बंधनकारक होते. साताऱ्यातील मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, सावरघरमध्ये नियमांचे उल्लंघन करून उत्खनन सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
वन्यजीव रक्षकाचे आरोप अन् अदानींना दणका
पाटण तालुक्यात प्रस्तावित अदानी समूहाच्या तारळी पंप स्टोरेज प्रकल्पावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मूळ पर्यावरण परवानगीत नमूद नसलेल्या सावरघर गावात मोठ्या प्रमाणावर उत्खनन व बांधकाम सुरू असल्याचा गंभीर आरोप करत, आवश्यक परवानग्यांशिवाय सुरू असलेल्या कामांची तत्काळ आणि स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली.
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने ११ फेब्रुवारी २०२५ रोजी १,५०० मेगावॅटच्या तारळी ओपन लूप पंप स्टोरेज प्रकल्पाला पर्यावरण परवानगी दिली होती. त्यानुसार, १५०.७४ हेक्टर क्षेत्रातील काम पाटण तालुक्यातील निवडे, तोंडोशी, कळंबे आणि जाळू या गावांसाठी मंजूर आहे. मात्र, त्याच प्रकल्पासाठी सावरघर येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे. मूळ पर्यावरण परवानगीत सावरघर या गावाचा समावेश नसल्याने त्या ठिकाणच्या कामाची व्याप्ती आणि वैधतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
हा प्रकल्प कोयना वन्यजीव अभयारण्यासह सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संभाव्य इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याने पर्यावरणीय आणि वन्यजीव संवर्धनाच्या तरतुदींची काटेकोर तपासणी आवश्यक असल्याचे पत्रात नमूद केले आहे. तसेच, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची पूर्वपरवानगी या कामांसाठी घेतली आहे का, याचीही पडताळणी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात पर्यावरण मंत्रालयाच्या १६ जुलै २०२० आणि २४ जुलै २०२० च्या मार्गदर्शक सूचनांचाही दाखला देण्यात आला आहे.
प्रकल्पाच्या परवानग्यांशी थेट संबंधित अधिकाऱ्यांऐवजी तटस्थ आणि वरिष्ठ यंत्रणेमार्फत प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी, पडताळणी पूर्ण होईपर्यंत पुढील अनधिकृत उत्खनन किंवा बांधकाम रोखण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही भाटे यांनी केली आहे. यानंतरच प्रशासनाला जाग आली असून, या तक्रारीच्या दुसऱ्याच दिवशी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही धडक कारवाई केली. सावरघरबाबत दाखल तक्रारीनुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सावरघरला भेट देऊन तेथील पंचनामे केले होते. त्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस यांनी कंपनीला यासंदर्भात अधिकृत पत्र पाठवून काम थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.